देवगड (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंदे, बेकायदेशीर दारू विक्री व वाहतूक तसेच अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी दिल्या आहेत. त्यानुसार देवगड पोलिसांनी कोटकामते परिसरात मोठी कारवाई करत गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका संशयित युवकाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगड तालुक्यातील कोटकामते येथील विशाल राजेश गावकर (२१) हा गोवा बनावटीची दारू वाहतूक करणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक शाम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने कोटकामते- नारिंग्रे मार्गावर सापळा रचून पाळत ठेवली. दरम्यान, संशयित ओमनी वाहन (एमएच ०७ एएन ९१४५) अडवून त्याची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनात ‘बॉब्स लेमन व्होडका’, ‘हनी ब्लेंड प्युअर ब्रँडी’ आणि ‘मॅकडॉवेल्स नं. १’ या ब्रँडची गोवा बनावटीची दारू आढळून आली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत वाहनासह संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईत सुमारे २ लाख २७ हजार ८०० रुपयांची दारू आणि २ लाख ५० हजार रुपये किमतीचे ओमनी वाहन असा एकूण ४ लाख ७७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५ (अ)(ई) अन्वये देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित विशाल गावकर याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार गणपती गावडे करीत आहेत. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव आणि पोलीस निरीक्षक शाम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिलकुमार पवार, पोलीस हवालदार गणपती गावडे, महेंद्र महाडीक, पोलीस कॉन्स्टेबल प्रथमेश कदम, प्रतीक जाधव, रविंद्र महाले यांनी सहभाग घेतला.












