अंडर करंट ! किरण सामंतांच्या कार्यकर्त्यानी संपर्क कार्यालय बॅनर वरून हटवली उदय सामंतांची छबी

खासदारकी ची उमेदवारी न मिळाल्याचा असंतोष होतोय उघड

रत्नागिरी (प्रतिनिधी) : उद्योजक आणि शिवसेना नेते किरण सामंत यांच्या कार्यालयासमोर लावण्यात आलेले उदय सामंत यांचा फोटो असलेले बॅनर तसेच उदय सामंत यांचा स्वतंत्रपणे लावण्यात आलेला फोटो अचानक हटवण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीची उमेदवारी न मिळाल्यामुळे किरण सामंत नाराज आहेत आणि त्यातूनच हा प्रकार घडला असल्याची चर्चा सुरू आहे. उदय सामंत नाही तर किरण सामंत संपर्क कार्यालय असा बॅनर लागणार असल्याची भूमिका किरण सामंतांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. यामुळे कोकणात राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसून येत आहे. दरम्यान याबाबत किरण सामंत यांची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र या कृतीतून किरण सामंत स्वतंत्र वाटचालीचे संकेत देत असल्याची चर्चा आहे.काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअप स्टेटसची चर्चालोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाल्यापासून किरण सामंत यांनी शिंदेसेनेकडून निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छुक असल्याचे उघडपणे मांडले. त्यानंतर उमेदवारी जाहीर होईपर्यंत मधल्या काळात किरण सामंत यांनी ठेवलेले स्टेट्स बऱ्याच वेळा चर्चेत आले. या मतदारसंघांमध्ये भाजपला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर किरण सामंत यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतली आणि पक्षासाठी काम करणार असल्याचे जाहीर केले. त्यांनी असे जाहीर केले असले तरी त्यांचे जवळचे कार्यकर्ते मात्र याबाबतची नाराजी व्यक्त करत होते. गेले काही दिवस रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीचा प्रचार सुरळीत सुरू आहे. किरण सामंत आणि मंत्री उदय सामंत हे दोघेही महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारामध्ये सहभागी होत आहेत. मात्र तरीही सर्व काही आलबेल नसल्याचा मुद्दा आता पुन्हा पुढे आला आहे. मंगळवारी ३० एप्रिल रोजी किरण सामंत यांनी ठेवलेले स्टेट्सही चर्चेत आले आहे. वेळेला जो उपयोगी पडतो तो आपला, असे त्यांनी स्टेट्समध्ये पोस्ट केले होते. त्यानंतर आज महाराष्ट्र दिनी दुपारी त्यांच्या रत्नागिरीतील संपर्क कार्यालयासमोर लावण्यात आलेला एक बॅनर हटवण्यात आला. त्यावर मंत्री उदय सामंत यांचा फोटो होता. त्या पाठोपाठ कार्यालयाच्या दर्शनी काचेवर लावण्यात आलेला उदय सामंत यांचा फोटोही काढण्यात आला आहे. तर आज पुन्हा किरण सामंतांच्या कार्यकर्त्यांनी मन की बात अशा आशयाचे स्टेट्स ठेवल्याचं पाहायला मिळालं. यातूनच सध्या कोकणच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असल्याचं समोर आलं आहे.कोकणात राजकीय घडामोडींना वेगकिरण सामंत संपर्क कार्यालय अशा आशयाचं पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रत्नागिरी शहरातील प्रसार माध्यमांच्या ग्रुपवर हे पोस्टर व्हायरल होत आहे. किरण सामंत यांचा याला दुजोरा आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.नेमकं प्रकरण काय?कोकणात उदय सामंत यांचे बॅनर आणि फोटो हटवले गेल्याची चर्चा जोरात सुरू झाली. रत्नागिरी शहरांमध्ये शिवसेनेच्या दोन कार्यालयावरून उदय सामंत यांचे फोटो आणि बॅनर हटवले गेलेले आहेत. त्यामुळे हे बॅनर का हटवले गेले? याची चर्चा सुरू झाली. रत्नागिरी शहरातील जयस्तंभ, माळ नाका आणि मारुती मंदिर ज्या ठिकाणी शिवसेनेची कार्यालय आहेत. शहरातील जयस्तंभ या ठिकाणच्या कार्यालयामधून उदय सामंत यांचा कारभार हाकला जातो. तर उर्वरित दोन कार्यालयांमधून त्यांचे थोरले बंधू किरण सामंत कामकाज पाहतात. या दोन्ही ठिकाणी कामानिमित्त उदय सामंत यांचा येणं-जाणं देखील असतं. पण माळनाका आणि मारुती मंदिर या ठिकाणच्या कार्यालयावरून उदय सामंत यांचा फोटो आणि फोटो असलेले बॅनर हटवले गेले आहेत. त्या ठिकाणी आता नवीन बॅनर लावला गेला असून त्यावर उदय सामंत यांचा फोटो नाही. तर किरण सामंत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो आहेत. दरम्यान, उदय सामंत यांचे फोटो काढणे आणि फोटो असलेला बॅनर काढणे त्याचे सध्या राजकीय अर्थ काढले जात आहेत. उदय सामंत यांचा फोटो असलेला बॅनर काढले गेल्यानंतर अगदी पुढच्या तासाभरामध्येच नवीन बॅनर लावला गेला. त्यावर उदय सामंत यांचा फोटो नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात या घटनेची चर्चा जोरात सुरू आहे.किरण सामंत यांची नेमकी भूमिका काय?काही दिवसांपूर्वीच किरण सामंत महायुतीचा प्रचार करताना दिसले. त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीही घेतल्या. पण, आता अचानकपणे किरण सामंत यांच्या कार्यालयावरील उदय सामंत यांचा बॅनर हटवण्यात आला आहे. नेहमी गजबजलेलं असणाऱ्या किरण सामंत यांच्या कार्यालयातही आज शुकशुकाट पाहायला मिळत आहे. त्यामुळे राजरीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!