संविधान आणि आरक्षण धोक्यात हा इंडिया आघाडीकडून अपप्रचार

भाजपामुळे देशात मुस्लिम दलित, आदिवासी समाजातील राष्ट्रपती झाले

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकतेय

कणकवली (प्रतिनिधी) : भाजपाचा अब की बार चार सौ पार चा नारा आहे. विरोधक यावरून भाजपाविरोधी अपप्रचार करत आहेत. भाजपाचे 400 खासदार निवडून आल्यास संविधान बदलले जाईल, आरक्षण धोक्यात येईल असा अपप्रचार राष्ट्रीय काँग्रेससह इंडिया आघाडी कडून होत आहे. भाजपामुळे देशात मुस्लिम दलित,आदिवासी समाजाला राष्ट्पती पदी स्थान मिळाले. रत्नागिरी सिंधुदुर्गात भाजपा, मित्रपक्ष झटून कामाला लागले आहेत. त्यामुळे लोकसभेचे उमेदवार नारायण राणे बहुमताने विजयी होतील असा विश्वास चिमूर गडचिरोली चे खा.तथा भाजपा एसटी मोर्चाचे सरचिटणीस अशोक नेते यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी बाबुराव कोहळे, सुनील गपात, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, आरपीआय जिल्हाध्यक्ष अजित कदम, रमाकांत कदम, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक,मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, राजू राऊळ, नामदेव जाधव,महिंद्र सावंत, भूषण परुळेकर, सुनील पारकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना खा. नेते म्हणाले की, महाराष्ट्रात तिसऱ्या फेरीतील मतदान 7 मे रोजी होत आहे. इंडिया आघाडी चे नेते अपप्रचार करत आहेत. खोटे बोल पण रेटून बोल अशी अवस्था इंडिया आघाडी ची आहे. पंतप्रधान मोदी यांनी देशहितासाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. 10 वर्षांत मोदींनी देशाचा चेहरामोहरा बदलला.विश्वगुरु म्हणून मोदींची ओळख आहे. समाजातील सर्व घटकांना मोदींनी न्याय दिला.भाजपा सरकार आले तर संविधान बदलले जाईल, आरक्षण नष्ट होईल असा अपप्रचार विरोधक करताहेत.मागील 10 वर्षे बहुमत असतानाही भाजपाने संविधान बदलण्याचे पाप केले नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळे पंतप्रधान झालो ही मोदींची भावना आहे. भाजपा जर मुस्लिम विरोधी, आदिवासी विरोधी असती तर ए.पि.जे.अब्दुल कलाम, द्रौपदी मुर्मु राष्ट्रपती झाल्या नसत्या. भाजपा दलित विरोधी असती तर दलित राष्ट्रपती झाले नसते. इंदू मिल च्या जागेवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक भाजपा मुळे होत आहे.लंडन मधील बाबासाहेबांचे राहते घर फडणवीस यांच्या काळात राज्य शासनाने विकत घेऊन बाबासाहेबांची स्मृती जपली आहे. आदिवासींचे आराध्य दैवत बिरसा मुंडा यांच्या स्मृतिनिमित्त 15 नोव्हेंबर हा गौरव दिवस जाहीर केला आहे. पंतप्रधान मोदी चांगले काम करत असताना 400 च्या वर खासदार निवडून आल्यास संविधान बदलले जाईल असा अपप्रचार इंडिया आघाडीकडून होत आहे असे चिमूर गडचिरोली चे खा.तथा भाजपा एसटी मोर्चाचे सरचिटणीस अशोक नेते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!