कोकणची निसर्गरम्य किनारपट्टी गुजराती लॉबीच्या घशात घालण्याचे मोदी-शहांचे षडयंत्र !!
उबाठा गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे नारायण राणेंवर टिकास्त्र
कणकवली (प्रतिनिधी) : नारायण राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीमध्ये गुजराती बांधवांचा मेळावा घेतला आणि त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणमध्येही मेळावा घेतला. त्यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात घेतलेले गुजराती बांधवांचे मेळावे हे एका व्यापक षडयंत्राचा भाग आहेत. कोकणच्या निसर्गरम्य किनारपट्टीवर आणि इथल्या जमिनींवर गुजराती लॉबीचा पहिल्यापासूनच डोळा आहे. आता कोकणची किनारपट्टी त्यांना बहाल करण्यासाठी नारायण राणेंना भाजपने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. गुजराती लॉबीसाठीचे ते तारणहार आहेत. त्यामुळे भविष्यात गुजराती लॉबीपासुन कोकणच्या मातीचे रक्षण करायचे असेल तर लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंचा पराभव करणे ही काळाची गरज आहे, अशी टिका उबाठा गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली आहे.
देशाच्या स्वातंत्र्यापासूनच गुजरात्यांचा महाराष्ट्रावर असलेला आकस लपुन राहिलेला नाही. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी गुजराती मोरारजी देसाईंनी केलेले प्रयत्न आणि त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभारून शेकडो हुतात्म्यांनी बलिदान करून दिनांक १ मे १९६० रोजी मुंबईसह मिळवलेला संयुक्त महाराष्ट्र हे सर्वश्रुत आहे. आता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी व अमित शहा हे दोन गुजराती केंद्रात सत्तेवर आल्यामुळे महाराष्ट्रावर आकस ठेवुन मराठी माणसाचे खच्चीकरण करण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन वेदांता फॉक्सकॉनसारखा तीन लाख कोटींचा लाखो मराठी युवकांना रोजगार देण्याची क्षमता असलेला प्रकल्प पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथून गुजरातला पळविण्यात आला. त्याचवेळी रिफायनरी सारखा कोकणच्या निसर्गरम्य पर्यावरणाचा विध्वंस करणारा विनाशकारी प्रकल्प कोकणातील जनतेचा प्रखर विरोध असतानाही भाजप सरकारकडून माथी मारला जात आहे. कोकणच्या निसर्गरम्य परिसरात भाजपला रिफायनरीसारखे प्रदूषणकारी प्रकल्प आणुन इथल्या पर्यावरणाचा विनाश करायचा आहे. कोकणचा केमिकल झोन करण्याचीच भाजप नेत्यांची मानसिकता होती. त्यासाठीच त्यांनी रिफायनरीसारखा विनाशकारी प्रकल्प राजापूर तालुक्यात आणला. नारायण राणेंनी सुरुवातीला रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला. आमदार नितेश राणेंनी रिफायनरी विरोधात मंदिरात देवगड येथील रामेश्वर मंदिरात घंटानाद आंदोलन केले, रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यासाठी श्री देव रामेश्वराला स्मरून शपथा घेतल्या, इतकेच कशाला देवगड तालुक्यात रिफायनरी प्रकल्पाविरोधात भव्यदिव्य मोर्चा देखील काढला. शेवटी भाजपने हा महत्वाकांक्षी प्रकल्प रेटण्यासाठी नारायण राणेंना राज्यसभेतुन खासदारकी दिली. ही खासदारकी म्हणजे रिफायनरी प्रकल्पासाठी मध्यस्थीची भूमिका घेण्यासाठीचा भाजपने प्रयत्न केला होता. खासदारकी मिळतात राणे कुटुंबीयांनी पुर्णपणे यु-टर्न घेऊन स्थानिक ग्रामस्थांचा टोकाचा विरोध असताना विनाशकारी रिफायनरी प्रकल्प कोकणात रेटण्याचा पुर्ण प्रयत्न केला. फक्त राज्यसभेच्या खासदारकीसाठी नारायण राणेंनी कोकणी जनतेसोबत बेईमानी केली. त्यानंतरही रिफायनरी प्रकल्पाला लोकांचा विरोध कमी होत नसल्यामुळे भाजपने नारायण राणेंना केंद्रात मंत्रीपद दिले. त्यांनी आपल्या परीने रिफायनरी प्रकल्प रेटायचा पुरेपुर प्रयत्न केला परंतु सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी शिवसेना व खासदार विनायक राऊत ठामपणे उभे राहिल्यामुळे राणेंना रिफायनरी प्रकल्प रेटणे शक्य झाले नाही.
रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या पत्रकाराचा मृत्यू झाला. हा मृत्यू म्हणजे घातपात होता व त्या पाठीमागे कोणाचे कार्यकर्ते होते हे सर्वज्ञात आहे. प्रकल्पस्थळी झालेल्या मातीपरीक्षणाला स्थानिकांनी विरोध केला. त्याठिकाणी ग्रामस्थांवर पोलीसांकडून अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला आणि अश्रुधुराचे गोळे सोडण्यात आले. त्यात अनेक ग्रामस्थांना दुखापत झाली तरीही ते गोरगरीब ग्रामस्थ आपल्या आंदोलनावर ठाम राहिले. एखाद्या मोठ्या पदासाठी विनाशकारी प्रकल्प रेटायची ही नारायण राणेंची पहिलीच वेळ नव्हे. कॉंग्रेसमध्ये असताना विनाशकारी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रेटण्याच्या बदल्यात नारायण राणेंनी कॉंग्रेस पक्षाकडे राज्याच्या मुख्यमंत्री पदाची मागणी केली होती. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पविरोधी आंदोलनात पोलीसांकरवी गोळीबार केला होता.
केंद्रीय मंत्रीपदाच्या स्वार्थासाठी गुजराती लॉबीचे कोकणातील पाळीमुळे रोवून देण्यासाठी नारायण राणे लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. रिफायनरी परिसरात जमीन खरेदी करणाऱ्यांमध्ये किती गुजराती लाबी आहेत व त्यांनी किती एकर जमिनी खरेदी केल्या आहेत. रिफायनरी परिसरात जमीन खरेदी करणाऱ्यांमध्ये अखिलेश हरिश्चंद्र गुप्ता आणि नमिता अखिलेश गुप्ता – ९२ एकर, धार्मिल झवेरी – ३ हेक्टर, सोनल पिकेश शहा – ७.५ हेक्टर, विकेश वसंतलाल शहा – १५६ गुंठे, निकेश शहा – ३ हेक्टर, रुपल विनीतकुमार शहा – ४ हेक्टर, अपर्णा तेजस शहा – १० हेक्टर, देवेंद्र शर्मा – ४.५ हेक्टर, सोनल शहा – २ हेक्टर, श्रीकांत मिश्रा – २ हेक्टर, शशिकांत वालचंद शहा – ४.५ हेक्टर, नरेंद्र सिसोदिया – ४.५ हेक्टर या सर्व गुजराती लँड माफियांवर नारायण राणेंचाच वरदहस्त आहे. कोकणातील जमीन स्वस्त दरात खरेदी करून ती कालांतराने मोठ्या प्रकल्पासाठी चढय़ा भावाने विकायची यासाठी गुजराती लॉबीची कोकणच्या किनारपट्टीवर वक्रदृष्टी पडलेली आहे. त्यांना नारायण राणेंसारखा खासदार भेटला तर भविष्यात कोकण किनारपट्टी गुजरात्यांच्या ताब्यात गेल्याशिवाय राहणार नाही. या गुजराती लॉबीला वेळीच आवर घालण्यासाठी येत्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंचा मोठ्या मताधिक्याने पराभव करावा लागेल, असे आवाहन सुशांत नाईक यांनी केले.