आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून नेरूर येथील श्री कलेश्वर मंदिरासाठी तीन मजली भक्तनिवास आणि हॉलची होणार उभारणी

महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या ३ कोटीच्या कामाला मिळाला कार्यारंभ आदेश

कुडाळ (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करून नेरूर येथील श्री कलेश्वर मंदिरासाठी भक्तनिवास आणि हॉल मंजूर करून घेतला होता. महाराष्ट्र शासन प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत या भक्त निवास आणि हॉलच्या बांधकामासाठी तब्बल ३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र दरम्यानच्या कालावधीत सरकार बदलल्यानंतर शिंदे – फडणवीस सरकारकडून महाविकास आघाडीच्या कामांना स्थगिती देण्यात आली होती. मात्र त्याविरोधात न्यायालयात केस दाखल केल्यानंतर न्यायालयाने मंजूर कामांवरील स्थगिती उठविल्याने श्री कलेश्वर मंदिराच्या भक्तनिवास आणि हॉल बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कामाला कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. आता लवकरच प्रत्यक्षात या कामास सुरुवात होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरापासून ५ कि.मी.अंतरावर असलेल्या नेरूर गावातील श्री देव कलेश्वर मंदिर हे प्राचीन मंदिरापैकी एक मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. महाशिवरात्रीला याठिकाणी जिल्ह्यातील लाखो भाविक श्री देव कलेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या श्री कलेश्वर मंदिरामध्ये येणाऱ्या भाविक भक्तगणांच्या सोयीसाठी धर्मशाळा बांधण्याची मागणी देवस्थान समितीने तसेच नेरुर ग्रामस्थ व माजी सरपंच शेखर गावडे, विनय गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे केली होती. त्याचबरोबर आमदार वैभव नाईक दरवर्षी आयोजित करीत असलेल्या शिमगोत्सव रोंबाट स्पर्धेला तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आले असताना त्यांनी रोंबाट या पारंपरिक लोककलेचा गौरव केला होता तेव्हा आदित्य ठाकरे यांच्याकडे देखील धर्मशाळा उभारण्याची मागणी करण्यात आली होती. ही मागणी पूर्ण करण्याचा शब्द आ. वैभव नाईक यांनी दिला होता. नेरूर गावात रोंबाट ही पारंपरिक लोककला जोपासली जात असल्याने आ. वैभव नाईक यांना नेरूर गावाबाबत विशेष आकर्षण आहे. शिमगोत्सवात मांड उत्सवाला ते आवर्जून उपस्थित राहतात.

त्यामुळे नेरूर वासीयांची महत्वाची मागणी पूर्ण करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करून महाराष्ट्र शासन प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत नेरूर येथील श्री कलेश्वर मंदिराच्या भक्तनिवास आणि हाॅलसाठी तब्बल ३ कोटीचा निधी मंजूर करून घेतला. या निधीतून ७१०१ स्क्वेअर फूटचा तीन मजली सुसज्ज असा भक्तनिवास आणि हॉल याठिकाणी उभारला जाणार आहे. लवकरच प्रत्यक्षात या कामाला सुरुवात होणार आहे. त्याबद्दल श्री कलेश्वर देवस्थान समिती व नेरूर ग्रामस्थांनी माजी मंत्री,आमदार आदित्य ठाकरे व आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!