स्वतःच्याच कार्यकर्त्यांचा प्रवेश दाखवण्याची वैभव नाईकांवर नामुष्की ; भाजपा बूथ अध्यक्ष दिलीप सांगवेकर यांची माहिती
मालवण (प्रतिनिधी) : कुंभारमाठ गावातील कट्टर राणे समर्थक असलेल्या माजी सरपंच वैशाली गावकर आणि तृप्ती लंगोटे यांनी आपल्या महिला कार्यकर्त्यांसह भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्याच्या बातम्या आ. वैभव नाईक यांच्या मार्फत देण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात या दोघांनाही भाजपाशी संबंध नाही. या दोघीही जणी उबाठा मध्येच कार्यरत होत्या. निवडणुकीच्या तोंडावर स्वतःच्याच कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेश दाखवण्याची वेळ वैभव नाईक यांच्यावर आली असून जनता सुज्ञ आहे. त्यांच्या या भुलथापांना बळी पडणार नाही. या निवडणुकीच्या निकालानंतर वैभव नाईक यांचे पार्सल कणकवलीला परत पाठवणारच अशी प्रतिक्रिया भाजपचे बूथ अध्यक्ष दिलीप सांगवेकर यांनी दिली आहे.
वैशाली गावकर यांचा आजपर्यंत एकदाही भाजपाशी संबंध आला नव्हता. अगर त्या राणे समर्थक देखील नव्हत्या. तर तृप्ती लंगोटे यांनी दोन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपात बंडखोरी करून सरपंच पदाची निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांची त्याचवेळी हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्या उबाठा मध्येच सक्रिय होत्या. पण त्यांनी सरपंच निवडणुकीत उबाठाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवल्याने गावातील उबाठा कार्यकर्त्यानी त्यांना पक्षात घेण्यास विरोध दर्शवला होता. मागील लोकसभा निवडणुकीत या दोघीही जणी उबाठा चे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारात सक्रिय होत्या. तरीदेखील गावातून खा. नारायण राणे यांना 70 % मते मिळाली. आताच्या निवडणुकीत वैभव नाईकांकडे कोणीही नसल्याने या दोघांना पक्षात घेण्यात आले. मात्र लोकांची दिशाभूल करण्यासाठी त्यांना राणे समर्थक असल्याचे लेबल लावण्यात आले. परंतु, या दोघांचाही भाजपा अथवा राणे कुटुंबाशी संबंध नाही. या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना गावातून ८० ते ९०% मतदान मिळवून देणारच असे श्री. सांगवेकर यांनी म्हटले आहे.
आमदार वैभव नाईक हे मागील दहा वर्षे निष्क्रिय ठरल्याने या निवडणुकीत स्वतःचा पराभव त्यांना समोर दिसू लागला आहे. मागील अडीच ते तीन वर्षांपासून निलेश राणे यांनी कोणतेही संविधानिक पद नसताना देखील मतदार संघ पिंजून काढून महायुती सरकारच्या माध्यमातून विकासाची गंगा प्रत्येक गावागावात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याने स्वतःचे डिपॉझिट वाचवण्यासाठी त्यांच्याकडून गावागावात खोटे पक्ष प्रवेश दाखवले जात असल्याचा आरोप सांगवेकर यांनी केला आहे.