कट्टा येथे भंडारी समाजाच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
मसुरे (प्रतिनिधी): कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज पुन्हा एकदा जोमाने उभा राहतोय हे आजच्या तुमच्या उपस्थिती वरून दिसत आहे. सर्व समाज बांधव एवढ्या तळमळीने एकत्र आले हे पाहून समाज बांधवांचा अभिमानही वाटतोय. आगामी काळात भंडारी समाज पुढे नेण्यासाठी युवा समाज बांधवांनी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. त्यासाठी आमची सदैव साथ त्यांना असेल. अन्यायाविरुद्ध पेटून उठणे आणि नेहमी सहकार्य करण्यासाठी तत्पर असणे ही आपल्या समाजाची ओळख आहे. ही ओळख अशीच कायम ठेवण्यासाठी समाज बांधवांनी एकजूट कायम ठेवावि असे आवाहन भंडारी महासंघाचे अध्यक्ष वासुदेव उर्फ मामा माडये यांनी कट्टा येथील आयोजित भंडारी समाजाच्या मेळाव्या दरम्यान बोलताना केले. मालवण तालुक्यातील कट्टा येथील ओम गणेश साई मंगल कार्यालयात कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज कट्टा यांच्यावतीने सत्कार समारंभ व वधू – वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा शुभारंभ मामा माडये यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व श्री गणरायाच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा भंडारी संघाचे माजी अध्यक्ष अतुल बंगे, माजी जिल्हा सचिव राजू गवंडे, सुनील नाईक, वासुदेव पावसकर, सतीश कांबळी, मामा बांदिवडेकर, प्रदीप आवळेगावकर, रमेश वाईरकर, दिलीप वेंगुर्लेकर, अशोक पराडकर, श्रद्धा केळुस्कर, मनीषा वराडकर, बाबुराव मसुरकर, उदय वायंगणकर, सपना पावसकर, सौ. नार्वेकर, सौ. खोत आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ यांच्यावतीने पंचक्रोशीतील कट्टा, पेंडूर, काळसे, धामापूर, आंबेरी, चौके, कुणकवळे, गोळवण, वडाचा पाट, गावराई, मसुरे, नांदोस, वराड, तळगाव, सुकळवाड या भागातून निवडणुकीत विजयी झालेले सरपंच, उपसरपंच, ग्रा. प. सदस्य, आजी माजी सभापती, उपसभापती, सरपंच उपसरपंच, ग्रा. प. सदस्य यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच समाजातील विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या समाज बांधवांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी वासुदेव पावसकर, सुनील नाईक, बाबुराव मसुरकर, सपना पावसकर, सौ खोत, सौ नार्वेकर, मसुरे येथील वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर हिचा शैक्षणिक व कला क्षेत्रातील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती श्वेता तेंडुलकर, सोनाली पावसकर यांनी मनोगत व्यक्त केले. भंडारी समाज एकत्रित करून पुन्हा नव्याने समाजाला उभारी देणारे व मेळावा यशस्वी करण्यासाठी धडपड करणारे समाज बांधव मंगेश माडये, निलेश हडकर, सुरेश कांबळी, मामा बांदिवडेकर, प्रदीप मिठबावकर, विशाल वाईरकर, प्रकाश सरमळकर, विद्याधर चिंदरकर, गणेश विजय वाईरकर, गणेश रमेश वाईरकर, वासुदेव पावसकर, अशोक पराडकर, संजय नाईक, झुंजार पेडणेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सकल भंडारी हितवर्धक संस्था मालवण सचिव पंकज पेडणेकर, संचालक मिलिंद झाड, भाऊ साळगावकर, अजित गवंडे, सचिन गवंडे, आनंद वराडकर, लता खोत, सतीश वाईरकर, अजय मयेकर, मंदार वराडकर, मनमोहन डीचवलकर आदींसह बहुसंख्य समाज बांधव यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय नाईक यांनी तर प्रस्ताविक प्रदीप मिठबावकर, आभार प्रकाश सरमळकर यांनी मानले. सदर मेळाव्यात समाजातील विवाह इच्छुक युवक आणि युवती यांचा मोठा प्रतिसाद लाभला. सुमारे साडेतीनशे जणांनी आपली माहिती यावेळी नोंदविली आहे. यापुढील कालावधीत याबाबत अधिक माहिती साठी इच्छुक समाज बांधवांनी ओम गणेश साई मंगल कार्यालय येथे संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.