सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी शासकीय यंत्रणांचा गैरवापर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : लोकशाहीमध्ये सक्षम विरोधी पक्ष आणि त्यांच्या अभिव्यक्तीला महत्त्व आहे. पण आज देशात विशेषतः बिगर भाजप शासित राज्यामध्ये आणि महाराष्ट्रात विरोधकांचा आवाज दाबण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातोय. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यासाठी लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवून सत्तेचा गैरवापर होत आहे. ईडी, सीबीआय, एनआयबी अशा केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग विरोधी पक्षांची मुस्कटदाबी करण्यासाठी सत्ताधारी करत आहेत.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींपेक्षा जास्त मोठा भ्रष्टाचार खटला ठेवला गेला. त्यांना १३ महिने तुरुंगात ठेवण्यात आलं. मात्र चौकशीत हे सत्य नसल्याचे निष्पन्न झाले. माजी मंत्री नवाब मलिक यांनाही त्यांनी काही चुकीच्या गोष्टी लोकांसमोर आणल्या म्हणून तुरुंगात डांबण्यात आलं आहे. ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या जावयाला अटक करण्यात आली. ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या मागेही चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला आहे. यंत्रणांचा हा गैरवापर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच नाही तर अन्य विरोधी पक्षातील नेत्यांबाबतही सुरू आहे.

साम, दाम, दंड, भेद कोणत्याही मार्गे सत्ता मिळवण्यासाठी बिगर भाजप राज्यात भाजपचे सुरू असलेले उद्योग संपूर्ण देशाने पाहिले आहेत. फोडाफोडीचे राजकारण करून आणि आमदार पळवून राज्यांमधील सरकारं पाडण्याचे असत्याचे प्रयोग सुरू आहेत. महाराष्ट्र राज्यात तर आता खोके सरकार अशीच सद्याच्या सरकारची ओळख झाली आहे.

विरोधकांना संपविण्याचे असे विध्वंसात्मक राजकारण देशाच्या व राज्याच्या हिताचे नाही. कर्नाटक मध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये अशा राजकारणाला जनतेने नाकारल्याचे दिसून आले आहे. हेच चित्र आगामी काळात देशात व महाराष्ट्रातही दिसू शकेल. विरोधकांवर सुरू असलेल्या दबावतंत्राला लोकशाही मार्गाने विरोध करणे हे निरोगी लोकशाही करिता आवश्यक आहे. लोकशाही टिकवण्यासाठी आणि संविधांनकर्त्याना अपेक्षित लोकशाही पुनर्स्थापित करण्यासाठी आपण आमची ही भूमिका केंद्र शासनास व राज्य शासनास कळवावी,ही विनंती.यावेळी जिल्हाध्यक्ष श्री अमित सामंत प्रांतीक सदस्य तथा जेष्ठ नेते नंदू शेठ घाटे, कोकण विभागीय महिलाध्यक्षा सौ अर्चना घारे,उपाध्यक्ष अनंत पिळणकर संघटक सचिव काका कुडाळकर ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कनयाळकर, प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर अल्पसंख्याक सेल कार्याध्यक्ष नझीर भाई शेख,जिल्हा चिटणीस रूपेश जाधव डॉ सेल जिल्हाध्यक्ष डॉ संजीव लिंगवत वेंगुर्ला तालुका अध्यक्ष योगेश कुबल,कणकवली विधानसभा युवक अध्यक्ष देवा पिळणकर,सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, सावंतवाडी शहराध्यक्ष देवा टेमकर,व्यापार उद्योग सेल कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान,दर्शना बाबर देसाई, शरद शिंदे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!