महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांच्या हस्ते 5 फेब्रुवारी रोजी होणार सन्मान
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील अद्वैत फाऊंडेशन संस्थेला डोंबिवली येथील हेल्पिंग हँडस वेलफेअर सोसायटी डोंबिवली यांचा प्रतिष्ठेचा नवरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या हस्ते 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी वाजता डोंबिवली येथे पुरस्कार वितरण केले जाणार आहे.यावेळी आमदार ऍड. यशोमती ठाकूर, हावरे बिल्डर्स च्या चेअरमन हावरे, झी 24 तास च्या वृत्तनिवेदीका अनुपमा खानविलकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. संविधानिक मूल्य जपत सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रातील 9 संस्थांना नवरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. अद्वैत फाऊंडेशन च्या माध्यमातून गेली 6 वर्षे राष्ट्र सेवा दल चे शिबीर गोपुरी आश्रम वागदे येथे आयोजित केले जाते. समता बंधुता, समानता ही मूल्ये बाल आणि युवकांवर रुजवत मानवता धर्म जोपासणारा माणूस घडावा या उद्देशाने हे शिबीर आयोजित केले जाते. अद्वैत फाऊंडेशन च्या माध्यमतून पूरग्रस्तांना केलेले मदतकार्य, सामाजिक उपक्रमांतील सक्रिय सहभाग या बाबी लक्षात घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.