साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक प्रवीण बांदेकर यांचा कणकवलीत होणार नागरी सत्कार

अखंङ लोकमंच कणकवली तर्फे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गातील साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांच्या उजव्या सोंडेच्या बाहुल्या या कादंबरीस नुकताच साहित्य अकादमी हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याने अखंड लोकमंच, कणकवली यांच्यातर्फे व नगरपंचायत, कणकवली यांच्या सहयोगाने प्रवीण बांदेकर यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 6:00 वाजता कणकवली नगर वाचनालयाच्या सभागृहामध्ये माजी केंद्रीय कायदा मंत्री ॲड. रमाकांत खलप यांच्या हस्ते या नागरी सत्कार समारंभासाठी कणकवली नगरपंचायतचे नगराध्यक्ष समीर नलावडे, इन गोवा २४×७ चे संपादक प्रभाकर ढगे, मराठीतील महत्त्वाचे कवी वीरधवल परब, कवी समीक्षक प्रा. डॉ.गोविंद काजरेकर, प्रा.डाॅ. शरयू आसोलकर, कवी अनिल धाकू कांबळी, कवी मोहन कुंभार व अखंडचे नामानंद मोडक यांची प्रमुख उपस्थिती असेल.

प्रवीण बांदेकर हे आघाडीचे समकालीन साहित्यिक आहेत. याआधी सिंधुदुर्गातील वि.स. खांडेकर, आरती प्रभू, मंगेश पाडगावकर, सतीश काळसेकर, जयंत पवार अशा मोजक्याच साहित्यिकांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यांच्या सोबत आता नाव जोडले गेलेले प्रवीण बांदेकर हे सिंधुदुर्गात राहून लेखन करणारे व हा पुरस्कार प्राप्त करणारे पहिलेच साहित्यिक आहेत.

उजव्या सोंडेच्या बाहुल्या या मराठीतील महत्त्वाच्या कादंबरीसाठी प्रवीण बांदेकर यांना हा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला असून सांस्कृतिक अस्मितांच्या अतिरेकामुळे सामान्य माणसावर होणाऱ्या अन्यायाचे मूळ शोधण्याचा प्रयत्न ही कादंबरी करते. तळागाळातील माणूस शोषणापासून मुक्त व्हावा, बुद्धिजीवीना आपल्या कर्तव्याचे विस्मरण होऊ नये, हे या कादंबरीचे आशयसूत्र आहे. प्रवीण बांदेकर यांनी आपल्या जगण्याचा परिघ या कादंबरीमध्ये खूप खोलवर जाऊन रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे

चाळेगत या त्यांच्या कादंबरीमध्ये सिंधुदुर्ग आणि कोकण परिसरातील कष्टकरी लोकजीवनातील समस्यांचे चित्रण प्रकर्षांने जाणवते. इथली राजकीय, सामाजिक,आर्थिक सत्ता कशा प्रकारे माणसांचे शोषण करते,कोकण सारखी समृद्ध भूमी प्रकल्पांसाठी कशी विकली जात आहे ; याची चर्चा या कादंबरीमध्ये आहे. ही कादंबरीही मराठी साहित्यविश्वात बहुचर्चित ठरली होती.

इंडियन ॲनिमल फॉर्म या त्यांच्या कादंबरीने राजकीय सत्तेकडून होणाऱ्या माणसांच्या दमनांचे चित्रण केलेले दिसते. प्राणीमात्रांची प्रतीके वापरून माणसांना माणूस म्हणून एकत्र आणणाऱ्या कल्पनेतील नायकास कसे नामोहरम केले जाते याविषयी ही कादंबरी बोलत जाते. माणसांच्या जगण्याचे परिक्षेत्र प्राण्यांच्या माध्यमातून रेखाटण्याचा प्रयत्न या कादंबरीमध्ये खूप खोल पणे झाला आहे. घुंगुरकाठी , हरवलेल्या पावसाळ्याचा शोध, असे दोन ललित निबंध संग्रह, खेळ खंडोबाच्या नावाने, चीनभिन असे कवितासंग्रहही त्यानी लिहिले आहेत. तर चिंटू चुळबुळे ही बालकादंबरी व याशिवाय अनेक शोध निबंधांचे लेखन त्यानी केलेले आहे. वैनतेय या सावंतवाडीतून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिकाचे संपादन ते करतात.

सिंधुदुर्ग आणि एकूणच कोकणच्या दृष्टिकोनातून प्रवीण बांदेकर यांना प्राप्त झालेला हा साहित्य अकादमी पुरस्कार जिल्ह्यातील मराठी साहित्याच्या चळवळीसाठी प्रेरणा देणारा महत्त्वाचा पुरस्कार असल्याने त्यांचे नागरी सत्कारातून अभिनंदन करून त्यांच्या पुढील लेखनास शुभेच्छा देण्यासाठी कणकवलीकरांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे;असे अखंडचे नामानंद मोडक, राजेश कदम व विनायक सापळे यांनी मत व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!