जिल्हा ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेची उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे मागणी
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात भरमसाट रिक्षा परवाने देण्यात आल्याने आता प्रत्यक्षात रिक्षा स्टँड वर रिक्षा लावण्यास जागा उपलब्ध नाही. काही रिक्षा चालक अन्य रिक्षा स्टँड हद्दीत जावून व्यवसाय करतात त्यामुळे स्थानिक रिक्षा चालकांना रोजगार मिळत नाही. आदी विविध मुंद्यावर आज सिंधुदुर्ग जिल्हा ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे लक्ष वेधले. यावेळी नव्याने देण्यात येणारे रिक्षा परवाने तत्काळ बंद करण्यात यावे, रिक्षा चालकांनी आपले स्टँड वगळून अन्य रिक्षा स्टँड हद्दीत जावून व्यवसाय करू नये, याबाबत निर्णय घ्यावा. अशी मागणी केली. दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या आरटीए समितीच्या बैठकीत हे विषय ठेवून मार्गी लावले जातील. असे आश्वासन आरटीओ नंदकुमार काळे यांनी रिक्षा चालक मालक संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.
सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक मालक संघटनेच्या शिष्टमंडळाने आज उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे यांची भेट घेत विविध मुद्यांवर चर्चा केली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय शारबिद्रे, सुरेंद्र कोदे, सुधीर पराडकर, राजन घाडी, नागेश ओरोसकर, अनिल ओरोसकर, भिसाजी परब, दीपक चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने रिक्षा चालक मालक उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यात सुरुवातील जिल्हा परवाना, तालुका परवाना रिक्षा दिल्या जात होत्या..मात्र आता रिक्षाचे गाव परवाना मोठ्या प्रमाणात दिले जात आहेत. रिक्षांची संख्या जिल्ह्यात एवढी वाढली आहे की आता रिक्षा स्टँडवर रिक्षा लावण्यासाठी जागा नाही. त्याचा परिणाम रिक्षा व्यावसायिकांवर होत आहे. काही वेळा काही रिक्षा चालकांना एकही भाड़े मिळत नाही. त्यामुळे शासनाने आता रिक्षा परवाने देणे तत्काळ बंद करावे, काही गावातील रिक्षा चालक दुसऱ्या गावात किंवा आपल्या रिक्षा स्टँड ची हद्द सोडून दुसऱ्या स्टँड च्या हद्दीत जावून व्यवसाय करतात. त्यामुळे स्थानिक रिक्षा चालकांना भाडे मिळत नाही. परिणामी रिक्षा व्यावसायिकांमध्ये वाद होत आहेत. हे वाद काही वेळा विकोपाला जातात. त्यामुळे भविष्यात काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरटीओ ने यावर वेळीच लक्ष घालून निर्णय घ्यावा किंवा ज्या स्टँड ला रिक्षा लागत आहे. त्याच हद्दीत व्यवसाय करावा असे आदेश काढावेत. यासह अन्य विविध मुद्यांकदे रिक्षा चालक मालक संघटनेने उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आज लक्ष वेधले.