सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात सर्वांनी मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभागी व्हावे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

श्री क्षेत्र सिद्धगिरी संस्थानच्या वतीने कणेरी मठावरील पर्यावरण पूरक सेंद्रिय शेतीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : जागतिक स्तरावर वातावरणीय बदलामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाच्या जबाबदारीची जाणीव सर्वसामान्य लोकांना होणे आवश्यक आहे. त्याच पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानच्या वतीने दिनांक 20 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत कणेरी मठ येथे होत असलेल्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात पर्यावरण संवर्धनाचा जागर होत असून यामध्ये सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

कणेरी मठ येथे सिद्धगिरी संस्थानच्यावतीने सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवांतर्गत उभारण्यात आलेल्या विविध दालनांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देवून कार्यक्रमाच्या तयारीची माहिती घेतली. यावेळी श्री काडसिध्देश्वर स्वामीजी, पालकमंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर, खासदार संजय मंडलिक, विभागीय आयुक्त सौरभ राव, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, माजी आमदार अमल महाडिक, मठाचे विश्वस्त उदय सावंत, संतोष पाटील आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले की, सध्या जागतिक तापमान वाढ आणि बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या दुष्परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर जल, वायू, ध्वनी प्रदूषणाचे गंभीर परिणाम होत आहेत. पंचमहाभूतांच्या संरक्षणाबद्दल जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी कणेरी मठ येथे घेण्यात येणारा सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल व या ठिकाणी भेट देऊन जाणारा प्रत्येक नागरिक पुढील काळात पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्न करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पर्यावरण पूरक असलेली सेंद्रिय शेती खूप उपयुक्त असून राज्य शासन ही सेंद्रिय शेतीसाठी प्राधान्य देत आहे. सेंद्रिय शेतीचे उत्पादन घेणाऱ्या बचत गटांना त्यांच्या मालाची विक्री करण्यासाठी जिल्हा स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगून सेंद्रिय शेतीमुळे शेती पिकांच्या उत्पादकतेत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे सांगितले. कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने कणेरी मठावर घेण्यात येत असलेल्या सेंद्रिय शेती पिकांची त्यांनी पाहणी केली. या महोत्सव कालावधीत येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी विशेषत: शेतकरी बांधवांनी येथील सेंद्रिय शेतीला भेट देऊन या पद्धतीची शेती आपण स्वतः करण्याबाबतचा निश्चय करावा, असे आवाहन त्यांनी केले. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शासन सर्वोतपरी मदत करेल, अशी ग्वाही ही त्यांनी दिली.

याठिकाणी उभारण्यात आलेल्या आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी ही पंचमहाभूते व आयुर्वेद यावर आधारित सहा दालनांची पाहणी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली. पंचमहाभूतांची निर्मिती, त्यांचे उपयोग, मानवाकडून पंचमहाभूतांचा होणारा दुरुपयोग आणि त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांची माहिती येथील दालनांमध्ये देण्यात आली आहे. त्रिमिती मॉडेल, माहितीपत्रक, ध्वनी व प्रकाश व्यवस्थेच्या माध्यमातून पंचमहाभूतांचे महत्त्व या ठिकाणी अत्यंत उत्कृष्टपणे दाखवण्यात येत असून या ठिकाणी भेट देणारा प्रत्येक नागरिक हा पर्यावरण संरक्षणाचा संदेश येथून घेऊन जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी श्री सिद्धगिरी मठ येथील महादेवाचे दर्शन घेतले. तसेच 1100 देशी गायींच्या गोशालेची पाहणी केली. तसेच सिद्धगिरी हॉस्पिटलची पाहणी करुन याठिकाणी देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवा सुविधांची माहिती घेतली.
यानंतर गुरुकुलला भेट देवून गुरुकुल शिक्षणपद्धतीची माहिती घेतली. येथील विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सादर केलेल्या योगाची प्रात्यक्षिके, रोप योगा, बौद्धिक प्रात्यक्षिके, वैदिक गणित, आदी कलागुणांचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भरभरुन कौतुक केले. तसेच देशाच्या उन्नतीसाठी हातभार लागेल असे नावीन्यपूर्ण उपक्रम गुरुकुल शिक्षण पध्दती आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून देण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींनी मुख्यमंत्री महोदयांना सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच या ठिकाणी उभारण्यात आलेली गोशाला, गुरुकुल शिक्षण पद्धती, कृषी विज्ञान केंद्र, हॉस्पिटल सह आदींची माहिती दिली. या महोत्सवात शेकडो स्टॉल लावले जाणार आहेत. त्यामध्ये शासनाच्या विविध विभागांच्या महत्वपूर्ण लोककल्याणकारी योजनांची माहिती देणारे तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या अधिनस्त असलेल्या महिला बचत गटांचेही स्टॉल उभारले जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!