चीननं पुन्हा एकदा संपूर्ण जगाची वाढवली धाकधूक

 रहस्यमयी आजाराचा चीनमधील लहान मुलांमध्ये संसर्ग

मुंबई (ब्युरो न्यूज) : कोरोनाच्या उद्रेकाचं केंद्रबिदू ठरलेल्या चीननं पुन्हा एकदा संपूर्ण जगाची धाकधूक वाढवली. रहस्यमयी आजाराचा चीनमधील लहान मुलांमध्ये संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर यामुळे भारतामध्येही अनेक चर्चेला उधाण आले होते. पण आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून याबाबत अधिकृत परित्रक काढत माहिती दिली आहे.

H9N2 व्हायरसची प्रकरणे आणि श्वसनाच्या आजारासंबंधी झालेल्या उद्रेकावर भारत सरकार लक्ष ठेवून आहे. आरोग्य मंत्रालयाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटलंय की, चीनमधून नोंदवलेले एव्हीयन इन्फ्लूएंझा प्रकरणे आणि श्वासोच्छवासाच्या आजारांचा भारतात कमी धोका आहे, असे प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आलेय. त्याशिवाय जागतिक आरोग्य संघटनाही या आजाराकडे लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आलेय.

केंद्रीय आरोग्य मंत्रालय उत्तर चीनमधील H9N2 चा प्रादुर्भाव आणि मुलांमधील वाढत्या श्वसन आजाराच्या प्रकरणांवर बारीक लक्ष ठेवून आहे. चीनमध्ये आढळललेले एव्हीयन इन्फ्लूएन्झा प्रकरण तसेच श्वसनाच्या आजारापासून भारताला कमी धोका आहे. काही माध्यमांच्या वृत्तात उत्तर चीनमधील मुलांमध्ये श्वसनाच्या आजाराच्या वाढत्या संख्येचा उल्लेख आहे आणि याबाबत जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने एक निवेदन देखील जारी केले आहे.

सध्या उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे, चीनमध्ये गेल्या काही आठवड्यांमध्ये श्वसनाच्या आजारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. चीनमध्ये ऑक्टोबर 2023 मध्ये H9N2 (एव्हियन इन्फ्लूएन्झा विषाणू) चा संसर्ग एका व्यक्तीला झाल्याचे आढळून आला. त्यानंतर देशात एव्हीयन इन्फ्लूएंझाच्या मानवी प्रकरणांविरूद्धच्या तयारीबाबत चर्चा करण्यासाठी आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. ज्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात आला होता. आरोग्य संघटनेने केलेल्या एकूण जोखीम मूल्यमापनात त्यांच्याकडे आतापर्यंत नोंदवलेल्या H9N2 च्या मानवी प्रकरणांमध्ये मनुष्याकडून दुसऱ्या मनुष्याकडे संसर्ग पसरण्याची शक्यता कमी असून मृत्यूचे प्रमाण कमी असल्याचे आढळले आहे.

भारत कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक आरोग्य संकटाची स्थिती हाताळण्यासाठी तयार आहे. अशा सार्वजनिक आरोग्य समस्यांचा सामना करण्यासाठी समग्र आणि एकात्मिक कृती आराखडा स्वीकारण्यासाठी भारत एक आरोग्य दृष्टीकोनाच्या वाटेवर मार्गक्रमण करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!