अरुणा धरणग्रस्तांचा आरोप
वैभववाडी (प्रतिनिधी) : हेत किंजळीचा माळ येथील अरुणा धरणग्रस्तांच्या पुनर्वसन गावठाणाला स्वतंत्र महसुली गावाचा दर्जाबाबत तहसीलदार वैभववाडी यांनी जिल्हाधिकारी यांना चुकीचा अहवाल सादर केला आहे. त्यामुळे आमचा अर्ज निकाली काढण्यात आला आहे. असा आरोप करीत प्रत्यक्ष पुनर्वसन गावठाणात येऊन पंधरा दिवसाच्या आत चौकशी करून अहवाल सादर करावा. अन्यथा तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा हेत किजळीचा माळ येथील धरणग्रस्तांनी निवेदनाद्वारे केली आहे.
अरुणा मध्यम पाटबंधारे धरणातील बाधित १६२ धरणग्रस्तांचे कुटुंबाचे हेत गावात किंजळीचा माळ येथे सन २०१९ साली पुनर्वसन करण्यात आले आहे. या ठिकाणी १६२ निवासी भूखंड वाटप करण्यात आले असून यापैकी शंभर कुटुंबांना ताबा पावती देण्यात आले आहे. ६२ कुटुंबांना ताबा पावती देणे बाकी आहे. या ठिकाणी सध्या सुमारे ४५ घरे बांधण्यात आले असून या गावठाणाची लोकसंख्या ३८३ इतकी आहे. किंजळीचा माळ पुनर्वसन गावठाण हे प्रकल्पग्रस्तांच्या मूळ गाव आखवणे गावच्या सीमेलगत आहे. त्यामुळे गेली चार वर्ष येतील धरणग्रस्त हेत किंजळीचा माळ पुनर्वसन गावठाणाला स्वतंत्र महसुली गाव म्हणून दर्जा मिळावा.त्याला संबंधित हेत, आखवणे भोम ग्रामपंचायतीचे ना हरकत दाखला सुद्धा दिला आहे. धरणग्रस्त यासाठी गेली चार पाच वर्षे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे पाठपुरावा करीत आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी यांनी वैभववाडी तालुक्याचे तहसीलदार यांना धरणग्रस्तांच्या मागणीनुसार प्रत्यक्ष अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते परंतु तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या अहवालानुसार हेत किंजळीचा माळ येथील लोकसंख्या साधारणता ७५ इतकी असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे महसुली गावाचा दर्जा देण्याच्या निकषात सदर गावठाण बसत नसल्यामुळे स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देता येणार नाही. त्यामुळे आपला अर्ज निकाली ठेवण्यात येत आहे. असे पत्र निवासी उपजिल्हाधिकारी यांनी धरणग्रसतांना यदिले आहे. त्यामुळे हेतकिनळीचा माळ येथील धरणग्रस्त संतप्त झाले असून तहसीलदार यांनी दिलेला अहवाल चुकीचा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. येत्या पंधरा दिवसात फेर चौकशी अहवाल सादर करावा अन्यथा वैभववाडी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केले जाईल. असा इशारा निवेदनाद्वारे धरणग्रस्तांकडून देण्यात आला आहे. या निवेदनावर सुरेश नागप सुनील नागप महादेव नागप विजय नागप मानाजी घाग शिवाजी पडीलकर विनोद नागप यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.











