सावंतवाडी (प्रतिनिधी) : चोरटी वाळू वाहतूक प्रकरणी सावंतवाडी पोलीसात गुन्हा दाखल असलेल्या “त्या” दोघाही संशयित चालकांना आज अटक करण्यात आली. दरम्यान त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता प्रत्येकी १५ हजाराच्या जामीनावर मुक्तता करण्यात आली. दीपक कुमार छत्रियसिंग (३०) रा. खालची देवली-मालवण व संदीप नारायण चिंदरकर रा.कसाल-कुडाळ अशी त्यांची नावे आहेत. ही कारवाई ८ फेब्रुवारीला मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई – गोवा महामार्गावर मळगाव येथे पोलीस उपनिरीक्षक गणेश कऱ्हाडकर आणि त्यांच्या पथकाने केली होती. त्यानुसार येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोन्ही डंपर ताब्यात घेण्यात आले होते. तर आज चालकांना अटक करून न्यायालयात हजर केले असता जामीनावर मुक्तता झाली. याप्रकरणी अॅड. स्वप्निल कोलगावकर यांनी काम पाहिले.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई-गोवा महामार्गावरून चोरटी वाळू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कऱ्हाडकर हे मळगाव परिसरात गस्त घालत असताना त्यांना संबंधित डंपर ताब्यात घेण्यात यश आले. संबंधित दोन्ही डंपर गोव्याच्या दिशेने जात होते. दरम्यान कारवाईनंतर दोन्ही डंपर पोलिसांकडून जप्त करण्यात आले होते. मात्र चालक पसार झाले होते. त्यांना अटक करण्यात आज यश आले. तर त्या दोघांनाही येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची प्रत्येकी पंधरा हजार रुपयांच्या जामीनावर मुक्तता करण्यात आली.