वैभववाडी (प्रतिनिधी) : गेले काही दिवस मानव विकास एसटी बस वेळापत्रक कोलमडले आहे. बस वेळेत येत नसल्याने वैभववाडी तालुक्यातील विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. शुक्रवारी वैभववाडी – सडुरे शिराळे व वैभववाडी – नापणे या गाड्या उशिरापर्यंत न आल्याने सामाजिक कार्यकर्ते डी.के. सुतार व विद्यार्थ्यांनी वैभववाडी बसस्थानक चे वाहतूक नियंत्रक श्री दळवी यांना जाब विचारला. वैभववाडी तालुक्यासाठी असलेल्या मानव विकास च्या गाड्या दुसऱ्या तालुक्यात फिरवल्यास व यापुढे गाड्या वेळेत न आल्यास सर्व विद्यार्थ्यांना घेऊन उपोषण करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते डि. के. सुतार यांनी दिला आहे.
शुक्रवारी दुपारी 12 वाजता वैभववाडी बसस्थानकातून सुटणारी वैभववाडी – सडुरे शिराळे गाडी उशिरापर्यंत न आल्याने डि.के. सुतार व विद्यार्थ्यांनी वाहतूक नियंत्रक यांच्याकडे विचारणा केली. यावेळी वाहतूक नियंत्रक यांनी कणकवली विभाग नियंत्रक यांना संपर्क साधला. दरम्यान कणकवली येथून गाडी सुटली नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी विद्यार्थी व प्रवासी संतप्त झाले. त्यांना दुसऱ्या पर्यायी वाहनाचा वापर करावा लागला. मानव विकासच्या गाड्या वेळेत न येत असल्याच्या सर्व प्रवासी व विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. याची तात्काळ चौकशी व्हावी. असे डि.के. सुतार यांनी सांगितले. यावेळी आनंद पाटील, सुरेश सुतार व विद्यार्थी प्रवासी उपस्थित होते.