जिल्ह्यात ४५०० हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेती उपक्रम राबविण्यात येणार – बिग्रेडियर सुधिर सावंत

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : रासायनिक अवशेषमुक्त अन्न निर्मितीसाठी नैसर्गिक शेतीचे स्थान अधोरेखित झाले आहे. डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानाला शासनाने मंजूरी दिली असून नैसर्गिक शेती मिशनची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यात ४५०० हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेती उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती बिग्रेडियर सुधिर सावंत यांनी पत्रकार परिषदेत आज दिली.

शेतकऱ्यांना जीवनात समृद्ध आणि आनंद प्राप्त करण्यासाठी कृषि विज्ञान केंद्रामार्फत समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्पाची स्थापन केली आहे. हा प्रकल्प गावागावात राबवित आहोत. खास करून या प्रकल्पाच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीचा प्रचार प्रसार कृषी विज्ञान केंद्राद्वारे गेली ७ वर्षे करत आहोत. याला आता खरे यश प्राप्त झाले आहे. शासनाकडून डॉ. पंजाबराव नैसर्गिक शेती अभियान मंजूर करून घेतले आहे. डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानाची स्थापना होऊन हे अभियान महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. असे यावेळी सुधिर सावंत यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नैसर्गिक शेतीच्या ९ कृषी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यास मंजुरी मिळाली असून या माध्यमातून प्रति कंपनी ५०० हेक्टर प्रमाणे जिल्ह्यात एकूण ४५०० हेक्टर वर हे अभियान राबविण्यात येणार आहे. कृषि विज्ञान केंद्र व आत्मा विभागा मार्फत या अभियानाची अमलबजावणी करण्यात येणार आहे. यामुळे नैसर्गिक शेती खालील क्षेत्रामध्ये वाढ होणार असून प्रति हेक्टर ७ हजार रुपयांपर्यंत अनुदान ३ वर्षात प्रती शेतकऱ्याला मिळणार असून या मध्ये शेतीचे प्रमाणीकरण सुद्धा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतावर जैविक निविष्ठा तयार करण्याचे युनिट निर्माण करण्यात येणार आहेत. १० हेक्टरचा एक गट असे प्रत्येक समूहामध्ये ५० गट स्थापन करण्यात येणार आहेत.

शेतीमध्ये सातत्याने होत असलेल्या रसायनांचा अतिरिक्त वापर, त्यामुळे खालावलेल्या जमिनीचा पोत तसेच रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणीचे मानवी आरोग्यावर होत असलेले दुष्परिणाम याला पर्याय म्हणून नैसर्गिक शेतीला सुरवात झाली असून सध्या रसायनमुक्त फळे आणि अन्नधान्याची मोठया प्रमाणात मागणी वाढत आहे. या गोष्टी लक्षात घेता गेली ७ वर्ष नैसर्गिक शेतीचा प्रसार करत आहोत. केंद्र व राज्य सरकार कडून नैसर्गिक शेतीला आता मान्यता मिळाली आहे. त्यामुळे पुढील काळात नैसर्गिक शेतीवर भर देऊन मोठ्या प्रमाणात विषमुक्त अन्नाची निर्मिती केली जाणार आहे. अन्नधान्याच्या अधिक उत्पादनासाठी संकरित जाती, खते, कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके यांचा मोठ्या प्रमाणात असंतुलित वापर होतो. त्यामुळे जमिनीचा पोत बिघडतो. पर्यावरणाचे संतुलन बिघडते जमीन कडक होऊन नापीक होते. उत्पादित मालाची प्रत खालावते. शेतीतील खर्च वाढतो व शेतकरी तोट्यात जातो. त्यासाठी नैसर्गिक शेती हाच उत्तम पर्याय असल्याचे सिद्ध झाले आहे. हे तंत्रज्ञान गावागावात पोहोचविण्यासाठी किर्लोस कृषि विज्ञान केंद्र प्राधान्याने काम करत आहे. असे यावेळी माजी खासदार बिग्रेडियर सुधिर सावंत यांनी सांगितले. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ विलास सावंत, व कृषी प्रतिष्ठानचे सेक्रेटरी बाबुराव रावराणे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!