जिल्हा बँकेची खास सवलतीच्या दरात अबोली ऑटो रिक्षा कर्ज योजना ; आ. नितेश राणे यांची माहिती
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्याच्या रिक्षा स्टँडवर आता पिंक रिक्षा दिसणार आहे. जळगाव, सोलापूर शहरांप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा पिंक रिक्षा धावणार असून यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने अबोली ऑटो रिक्षा ही खास सवलतींच्या व्याज दरात योजना आणली आहे. ८ मार्च या जागतिक महिला दिनी जिल्ह्यातील पाच महिलांना रिक्षाची किल्ली देत याचा शुभारंभ केला जाणार आहे, अशी माहिती बँक संचालक आ नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बँक प्रधान कार्यालयातील अध्यक्ष दालनात आ राणे बोलत होते. यावेळी अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना आ राणे यांनी जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येत साडे पाच लाख महिलांची संख्या आहे. ही संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. लोकसंख्येने जास्त असलेल्या महिला जिल्ह्याच्या उद्योग, व्यवसायात, अर्थकारणात पुरुषांच्या तुलनेत दिसत नाहीत. महिलांचा हा सहभाग वाढावा. त्यांनी आत्मविश्वासाने पुढे यावे यासाठी जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक नेहमी प्रयत्नशील राहिले आहेत. तोच उद्देश घेवून जिल्हा बँकेने अबोली ऑटो रिक्षा ही योजना आणण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
यातून जिल्ह्यातील महिलांची हिम्मत वाढावी. कष्टाने त्या पुढे याव्यात, हा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यात विमानतळ सुरू झाले आहे. ताज, महेंद्र सारखी मोठी हॉटेल्स सुरू होत आहेत. विविध प्रकल्प येवू घातले आहेत. विकासाच्या या पर्वाला महिलांची साथ लाभावी. हा विकास साधला जात असताना महिलांना रोजगार मिळावा. त्यांची आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी ही योजना आणली असल्याचे आ राणे म्हणाले. जिल्ह्यातील महत्त्वाच्या रिक्षा स्टँडवर किमान पाच पिंक रिक्षा दिसाव्यात, असा आमचा प्रयत्न आहे. जिल्ह्यातील महिलांनी यासाठी पुढे यावे, असे आवाहन आ राणे यांनी केले.