देवगड (प्रतिनिधी) : कुणकेश्वर यात्रा नियोजन सभेत कुणकेश्वर वासियांकडून प्रशासनाला धारेवर धरण्यात आले.यात्रा नियोजन सभेमध्ये कुणकेश्वर ग्रामस्थ व देवस्थान ट्रस्टच्या पदाधिका-यांनी कुणकेश्वरकडे येणा-या रस्त्यांचा वाताहतीचा पाढा जिल्हाधिका-यां समोर वाचला. यात्रेपुर्वी प्रथम रस्ते सुधारा असा इशारा कुणकेश्वरवासियांनी नियोजन सभेत जिल्हा प्रशासनाचे प्रमुख असलेल्या जिल्हाधिका-यांना दिला.
कुणकेश्वर यात्रोत्सव नियोजनाची सभा कुणकेश्वर येथे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक पार पडली. यावेळी पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलिस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे, उपजिल्हाधिकारी वर्षा सिंघन पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे, तहसिलदार स्वाती देसाई, गटविकास अधिकारी अरूण चव्हाण, पोलिस निरिक्षक निळकंठ बगळे, कुणकेश्वर सरपंच चंद्रकांत घाडी, देवस्थान ट—स्ट अध्यक्ष संतोष लब्दे तसेच विविध विभागाचे खातेप्रमुख, देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
या बैठकीत देवस्थान ट—स्ट व ग्रामस्थांनी कुणकेश्वरकडे येणा-या रस्त्यांचा विषय उपस्थित केला.कुणकेश्वर येणा-या लिंगडाळ तिठामार्गे रस्ता, दहिबांव चेकपोस्टकडून येणारा रस्ता, देवगड तारामुंबरी मिठमुंबरी पुलमार्गे मंदीराकडे येणारा रस्ता या सर्व रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.हे रस्ते सुस्थितीत करून डांबरीकरण करावे अशी मागणी यावेळी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली.रस्त्यांचा विषयाकडे विशेष लक्ष द्यावे असे यावेळी सांगण्यात आले.
जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आरोग्य, वीजवितरण, एस्टी, बीएस्एनएल्, पाणीपुरवठा, ग्रामपंचायत विभाग या विभागांचा आढावा घेतला.आरोग्य विभागामार्फत दोन आरोग्य पथके आणि जिल्हास्तरीय एक अशी तीन पथके 17 ते 20 फेब्रुवारी या चार दिवशीय कालावधीत कार्यरत राहणार आहेत.तसेच चार रूग्णवाहिका कार्यरत राहणार आहेत.याशिवाय दोन पाणीशुध्दीकरण पथके कार्यरत राहणार आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राठोड यांनी दिली.
जिल्ह्यातुन यात्रेसाठी 80 एस्टी गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून देवगड आगारातून 35 गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे अशी माहिती स्थानकप्रमुख सैतावडेकर यांनी दिली.पुरूष व महिलांसाठी प्रत्येकी 9 अशी 18 शौचालयांचे नियोजन करण्यात आले अशी माहिती ग्रामसेवक गुणवंत पाटील यांनी दिली.यावेळी कुणकेश्वर समुद्रकिना-यालगत भाविकांच्या तिर्थस्नानावेळी सुरक्षिततेच्या दृष्टिने छोट्या नौका ठेवण्यात याव्यात अशी सुचना देवस्थान ट्रस्टच्यावतीने व्यवस्थापक रामदास तेजम यांनी केली.