कोल्हापूर (प्रतिनिधी) : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकाने अंतिम फेरीत धडक मारली अन् मोठे यश मिळवले. मूळचा कोल्हापूर येथील असलेल्या स्वप्निल कुसाळेने बुधवारी ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. अंतिम फेरीत मातब्बर खेळाडू मैदानात होते. फायनलमध्ये सुरुवातीला स्वप्निल सहाव्या स्थानी होता. अंतिम फेरीत एकूण आठ स्पर्धक होते. प्रत्येक नेमबाजाला ४० शॉट्सची संधी होती. हे शॉट्स पूर्ण झाल्यानंतर सर्वात कमी गुण असलेले दोन खेळाडू स्पर्धेबाहेर झाले. नंतर प्रत्येक एका शॉटनंतर सुवर्ण आणि रौप्य पदक निश्चित होईपर्यंत प्रत्येक १-१ खेळाडू बाहेर होत गेला.
Kneeling ची अर्थात पहिली फेरी पूर्ण होईपर्यंत स्वप्निल पाचव्या स्थानावर होता. आता स्टँडिंग शॉट्स पदकांचे चित्र स्पष्ट करणारे होते. यात स्वप्निलने चमकदार कामगिरी करत तिसऱ्या स्थानापर्यंत मजल मारली. या राऊंडच्या अखेरपर्यंत यूक्रेनचा खेळाडू अव्वल तर चीनचा दुसऱ्या आणि भारताचा स्वप्निल तिसऱ्या स्थानावर राहिला. या घडीला पाच स्पर्धक स्पर्धेत जिवंत होते. पण यातील एक खेळाडू स्पर्धेबाहेर झाल्याने स्वप्निलचे पदक पक्के झाले. कारण स्वप्निल आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूच्या गुणांमध्ये फार फरक होता. त्यामुळेच तिसऱ्या क्रमांकावर असलेला स्वप्निल पदक आणणार हे जवळपास निश्चित झाले. अखेर स्वप्निलने ऐतिहासिक कांस्य पदक जिंकलेच.
कोण आहे स्वप्निल कुसाळे ?
स्वप्निल कुसाळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. नेमबाज स्वप्निल कुसाळे कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील आहे. ६ ऑगस्ट १९९५ मध्ये जन्मलेल्या स्वप्निलने पॅरिसच्या धरतीवर चमक दाखवली. स्वप्निलचा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास खूपच भारी आहे. अभिनव बिंद्राला २००८ च्या ऑलिम्पिकमध्ये खेळताना पाहण्यासाठी स्वप्निलने १२वीच्या परिक्षेकडे कानाडोळा केला. २००९ मध्ये वयाच्या १४व्या वर्षी वडिलांनी स्वप्निलला महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनी योजनेत दाखल केले. तिथूनच त्याचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. सुरुवातीच्या काळात त्याने नेमबाजीतील आपले कौशल्य विकसित करण्यासाठी पुण्याला जाण्यापूर्वी नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतले. स्वप्निल सुरेश कुसाळे या ग्रामीण भागातील खेळाडूने आपल्या मेहनतीच्या जोरावर ऑलिम्पिकपर्यंत मजल मारली. महाराष्ट्रातून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंना महाराष्ट्र सरकारने पन्नास लाखांची मदत केली. सध्या रेल्वेमध्ये टि.सी असणारा स्वप्निल पुण्यातील बालेवाडी येथील क्रीडा संकुलात सराव करत होता. ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरल्यानंतर तो दिल्ली येथील रेंजवर सरावासाठी गेला होता.