सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा निसर्गरम्य आहे. त्याला साजेसे असे सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाचे शुशोभिकरण झाले आहे. त्याची स्वच्छता राखणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. तसेच येथील रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण करून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रोजगारासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. आता या परिसरातील जमीन मालकांनी या मोकळ्या जागेचा उपयोग करून दुकाने, हॉटेल व्यवसाय सुरू करून आपला रोजगार निर्माण करावा. असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी आज लोकार्पण सोहळ्यात बोलताना केले.
सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते तसेच खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सम्पन्न झाला. यावेळी भाजपा राज्य उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, जि प मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, सार्वजनिक बांधकामचे अधीक्षक अभियंता छाया नाईक, कोकण रेल्वेचे संचालक आर के हेगड़े, कार्यकारी अभियंता अजय सर्वगोड, माजी आमदार राजन तेली, रानबाबुळी सरपंच परशुराम परब, पडवे सरपंच आनंद दामोदर, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेर्से, माजी प स सदस्य सुप्रिया वालावलकर, दादा साईल, कोकणरेल्वे प्रवाशी संघर्ष व समन्वय समिती अध्यक्ष प्रकाश पावसकर, सिंधुदुर्ग रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शुभम परब, संतोष वालवलकर आदीं सह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते रेल्वे प्रवासीउपस्थित होते.
सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरण लोकार्पण सोहळ्यात बोलताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले भाजपच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास विविध मार्गाने सुरू आहे. त्याप्रमाणे येथील रेल्वे स्थानके सुस्थितीत असली पाहिजेत. येथे येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आनंद वाटला पाहिजे. यासाठी जिल्ह्यातील चार रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेतले आणि वर्षभरात ते पूर्णही झाले आहे. याचे समाधान आहे. रेल्वे स्थानकाकडे येणारे रस्ते वर्षानुवर्षे टिकले पाहिजेत यासाठी आपले प्रयत्न होते. संपूर्ण कोकणचा विकास करण्याचा ध्यास घेऊन आपले काम चालू आहे. त्यासाठी सर्वांचेच योगदान महत्त्वाचे आहे. शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत असून या योजना येथील तरुणांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, येथील तरुणांचे स्थलांतर थांबविण्यासाठी रोजगार निर्माण करण्यासाठी आपले प्रयत्न राहतील तसेच आता शासकीय कार्यालय परिसर सुशोभीकरण करण्याची काम लवकरच हाती घेण्यात येईल असे स्पष्ट केले.
यावेळी बोलताना खासदार नारायण राणे म्हणाले, सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाचे शुशोभीकरणाचे काम अतिशय सुंदर झाले आहे. मोठ्या शहरात आल्याचा आनंद इथे येणाऱ्या सर्वच प्रवाशांना घेता येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा निसर्गरम्य आहे. पर्यटन जिल्हा म्हणून त्याची ओळख आहे. विविध विकास कामांच्या माध्यमातून जिल्ह्याचे रूप बदलण्याचे काम पालकमंत्री रवींद्र चव्हाण करीत आहेत. याचा मला अभिमान वाटतो. संपूर्ण राज्यात गतीने पळणारा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पाहिले जाते. रेल्वे स्थानक परिसर सुशोभीकरण झाले आहे आता स्वच्छता राखणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. या रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण करून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. आता या परिसरातील जमीन मालकांनी या मोकळ्या जागेचा योग्य उपयोग करून दुकाने, हॉटेल व्यवसाय सुरू करून आपला रोजगार निर्माण करावा. असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी लोकार्पण सोहळ्या दरम्यान बोलताना केले.