सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या सुटाव्यात तसेच त्यांचे मूलभूत प्रश्न निकाली निघावे यासाठी जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र जनता दरबार घेण्यात येणार आहे. १२ ते १४ या कालावधीत प्रत्येक मतदार संघासाठी पूर्ण एक दिवस हा कार्यक्रम होणार आहे. यासाठी स्वतंत्र दहा टेबल मांडण्यात येणार आहेत. समस्या घेवून येणाऱ्या व्यक्तीची आणि त्याच्या समस्येची नोंदणी करण्यात येणार असून तो प्रश्न निकाली निघेपर्यंत त्याचा पाठपुरावा केला जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री चव्हाण यांनी ही माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली आदी उपस्थित होते.