राजकोट किल्ल्यावरून आप ने केला महायुती सरकारचा निषेध
मालवण (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आज आम आदमी पक्षाचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केली आहे. राजकोट किल्ल्यावरून आप ने महायुती सरकारचा निषेध केला यावेळी ते बोलत होते.
यप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष परेश साळवी, उत्तम पाटील, डॉ. कुमाजी पाटील, अभिजित कांबळे, मिली मिश्रा, दुष्यन्त माने, ओंकार पताडे, आदित्य बटावले, स्वप्नील मीठकर, राजू रोडये, संदेश सावंत, दीपेश आजवेलकर, अमित गावडे, संतोष चिंदरकर, नजीम माजगावकर आदी सिंधुदुर्गसह कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संदीप देसाई पुढे म्हणाले, मालवण येथील राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. अत्यंत घाई गडबडीने हा पुतळा तयार केला गेला. आठ महिन्यापूर्वी याचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. या घटनेसाठी महायुतीचे भ्रष्ट सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यानी केला.
सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर म्हणाले की, कंत्राटदाराचे निकृष्ट काम आणि कामामध्ये झालेला भ्रष्टाचार यामुळेच हा पुतळा कोसळला. स्वतःच्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी हे सरकार या प्रश्नावर राजकारण करू नका असं म्हणतंय. पुतळा पडल्याचे कोणतेही शल्य या सरकारच्या मंत्र्यामध्ये नाही, उलट काहीतरी चांगलं घडायचं असेल म्हणून पुतळा पडला असं अशास्त्रीय कारण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर देत आहेत. त्यामुळं या मुजोर, भ्रष्ट सरकारचा निषेध करत असल्याचं ताम्हणकर म्हणाले.
यावेळी आम आदमी पार्टी पदाधिकाऱ्यांनी राजकोट किल्ल्यावर निषेध आंदोलन करत महायुती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.