छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत..!

मी आज नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी

शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी केला खेद व्यक्त

पालघर (प्रतिनिधी) : “काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये जे काही घडलं, ते अत्यंत दुख:द आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर ते आमचे आराध्य दैवत आहेत. मी आज नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो. तसेच जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य मानतात, या घटनेमुळे त्यांच्या मनालाही जे वेदना झाल्या आहेत. मी त्यांच्यापुढेही नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी आज वाढवण बंदराचे भूमिपूजन केलं. यावेळी बोलताना त्यांनी सिंधुदुर्ग येथील घटनेवरही प्रतिक्रिया दिली.

विरोधकांच्या टीकेलाही दिलं प्रत्युत्तर पुढे बोलताना त्यांनी विरोधकांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं. “आमचे संस्कार वेगळे आहेत. त्या लोकांसारखे नाहीत, जे महाराष्ट्राचे सुपूत्र असलेल्या वीर सावरकरांना शिव्या देतात. विरोधकांनी अनेकदा सावरकरांना अपमानित केलं आहे. तसेच देशभक्तीच्या भावनेला पायदळी तुडवलं आहे. मात्र, त्यांनी कधीही वीर सावरकर यांची माफी मागितलेली नाही, विरोधकांचे संस्कार आता महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती झाले आहेत. हे आमचे संस्कार आहे. मी महाराष्ट्राच्या भूमीत येऊन सर्वात आधी छत्रपती शिवरायांची माफी मागितली आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. “वाढवण बंदरामुळे महाराष्ट्र औद्योगिक प्रगतीचं एक केंद्र बनेल” “आजचा दिवस महाराष्ट्राच्या विकासासाठी ऐतिहासिक दिवस आहे. विकसित महाराष्ट्रात विकसित भारताच्या संकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळेच मागच्या १० वर्षात असो किंवा सरकारचा तिसरा कारर्यकाळ असो. आमच्या सरकारने महाराष्ट्रासाठी मोठे निर्णय घेतले आहेत. महाष्ट्राजवळ विकासासाठी संसाधनं आहेत. महाराष्ट्रात राज्याच्या तसेच देशाच्या विकासाची मोठी क्षमता आहे, त्यामुळेच आज वाढवण बंदराचं भूमिपूजन करण्यात आलं आहे. या बंदरासाठी जवळपास ७६ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे, या बंदरामुळे महाराष्ट्र औद्योगिक प्रगतीचं एक केंद्र बनेल”, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. काही लोकांकडून महाराष्ट्राचा विकास रोखण्याचा प्रयत्न “२०१४ आधी वाढवण बंदराचे काम रोखून धरण्यात आले होते. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही या प्रकल्पावर काम सुरू केले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी मेहनत घेतली. मात्र २०१९ साली आमची सत्ता गेली, तेव्हा अडीच वर्ष पुन्हा प्रकल्पाचे काम रखडले. या एकाच प्रकल्पामुळे १२ लाख रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे. एवढी मोठी गुंतवणूक कुणी रोखून धरली, हे महाराष्ट्राच्या जनतेने विसरू नये. काही लोक महाराष्ट्राचा विकास रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, केंद्रातील एनडीए सरकार आणि राज्यातील महायुती सरकारला महाराष्ट्राला देशात नंबर एकच राज्य बनवायचं आहे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!