शाळकरी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना सहन करावा लागला नाहक त्रास
वैभववाडी (प्रतिनिधी) : नावळे सांगुळवाडी वैभववाडी रस्त्यालगत असणारा दुकान गाळा हटवण्यासाठी सांगुळवाडी पुला नजीक रस्त्यावर चिऱ्याचे दगड टाकून रस्ता अडवल्यामुळे नावळे गावात जाणाऱ्या तिन्ही एस टी बस रोखण्यात आल्या. या घटनेमुळे नावळे सांगुळवाडी गावातील शाळकरी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलीनी संबंधिताला सूचना दिल्यानंतर दगड हटवण्यात आल्याने वाहतूक सुरळीत सुरू झाली.
वैभववाडी सांगुळवाडी नावळे मार्गावर खालच्या राववाडी जवळ अनेक वर्ष संदिप रावराणे यांच्या मालकीच दुकान गाळा रस्त्यालगत असल्याने तो हटवण्यात यावा यासाठी गेले अनेक दिवस सांगुळवाडी येथील नागरिक स्वप्नील रावराणे यांनी जिल्हा परिषदेसह पंचायत समितीकडे तक्रार दाखल केली होती. पंचायत समिती या तक्रारीची कार्यवाही ग्रामपंचायत कार्यालय सांगुळवाडीकडे देण्यात आली होती ग्रामपंचायत सांगुळवाडी यांनी या तक्रारीची दखल घेत कार्यवाही करण्यात येईल असे तक्रारदार रावराणे यांना आश्वासन दिले होते. त्यानुसार आश्वासन पूर्तता न झाल्याने शुक्रवारी सकाळी तक्रारदार रावराणे यांनी दुकान गाळ्याच्या समोर रस्त्यावर जांभे दगड टाकून रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला. यामुळे नावळे गावात सकाळी 8 व 9 वाजता जाणाऱ्या एसटी बस सांगुळवाडी हद्दीतून मागे परतल्याने नावळे सांगुळवाडी गावातील शाळकरी मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले. अखेर या घटनेची माहिती वैभववाडी पोलिसांना कळताच वैभववाडी पोलीसांनी घटनास्थळी जाऊन बेकायदेशीरपणे रस्ता अडविल्यास आपल्यावर गुन्हा नोंद करण्यात येईल. अशी तक्रारदारास समज दिली नंतर रस्ता खुला करण्यात आला व वाहतूक सुरळीत सुरू झाली. दरम्यानच्या काळात सर्व सामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे.