आशा स्वयंसेविकांसाठी खुली निबंध लेखन स्पर्धा

वेताळ प्रतिष्ठान आणि कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंचचे आयोजन

मसुरे (प्रतिनिधी) : आशा स्वयंसेविका म्हणजे “आगामी स्वास्थ्य समर्थक” या भूमिकेत काम करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्या होय. आशा स्वयंसेविका लोकांना आरोग्य सेवांबाबत माहिती देतात आणि त्यांचा लाभ घेण्यासाठी प्रेरित करतात. बालकांचे लसीकरण वेळेवर होईल याची काळजी घेतात. आरोग्य समस्या, स्वच्छता आणि पौष्टिक आहाराबाबत लोकांना जागरूक करतात. गर्भधारणेसंबंधी मार्गदर्शन, प्रसूती काळातील सहाय्य, आणि बालकांच्या आरोग्याची देखभाल करतात. आरोग्य संबंधित समस्या आणि आवश्यकता ओळखून स्थानिक आरोग्य यंत्रणांपर्यंत पोहोचवतात. अशी बहुआयामी जबाबदारी आशा स्वयंसेविका अगदी अल्प मानधनात पार पाडत आलेल्या आहेत. कोरोना काळात तर आशांनी उत्कृष्ट कार्य करीत समाजासमोर आदर्श घालून दिला अशा सर्वच आशा स्वयंसेविकासाठी वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसच्या वतीने आणि कै.गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच, दाभोली, वेंगुर्ला यांच्या सहकार्याने खुल्या निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर निबंध लेखनासाठी स्त्रियांवरील वाढते अत्याचार: कारणे आणि उपाय’ हा विषय असून किमान ७०० तर कमाल १००० शब्दांमध्ये महिलांनी आपले मत सबंधित विषयावर मराठी भाषेत व्यक्त करायचं असून सोबत आशा स्वयंसेविका असल्याबाबत सरपंच किंवा शासकीय वैद्यकिय अधिकारी यांचे शिफारस पत्र जोडणे अनिवार्य आहे. स्पर्धेची पारितोषिक पुढीलप्रमाणे: प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ प्रथम, उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांकासाठी अनुक्रमे रोख रुपये १०००, ७००, ५००, २५०, २५० प्रत्येकी चित्रफ्रेम, प्रमाणपत्र आणि मेडल आणि सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. सदर निबंध कागदाच्या एका बाजूला स्व:हस्ताक्षरात लिहून पोस्टाने किंवा हाती वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस; द्वारा प्रा.डॉ. सचिन वासुदेव परुळकर, मु.पो.तुळस, ता:वेंगुर्ला ,जिल्हा: सिंधुदुर्ग, पिन-४१६५१५ या पत्त्यावर दिं.२५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत पाठवायचे आहेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी प्रा. डॉ. सचिन परुळकर (९४२१२३८०५३) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आंतरराष्ट्रीय पंच व क्रीडा संस्कृती प्रचारक अशोक दाभोलकर-मेस्त्री आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!