सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शिक्षण, समाजकारण, पर्यावरण, राजकारण अशा विविध क्षेत्रात प्रा. महेंद्र नाटेकर सरांनी केलेल्या कार्याचा नंदादीप पेटता ठेवण्यासाठी ‘नाटेकर सर स्मृतिग्रंथ’ सतत प्रेरणा देत राहील. त्यांच्या कार्याचे हे दस्तावेजीकरण अतिशय महत्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका कमलताई परुळेकर यांनी येथे केले.
प्रा. नाटेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त ‘माधुरी-महेंद्र प्रतिष्ठान’ने तयार केलेल्या ‘नाटेकर सर स्मृतिग्रंथा’चे प्रकाशन श्रीमती परुळेकर यांच्याहस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. महेंद्र नाटेकर, उपाध्यक्ष सतीश लळीत, सचिव व स्मृतिग्रंथाच्या संपादक डॉ. सई लळीत उपस्थित होत्या. कणकवली केंद्रशाळेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात स्व. प्रा. नाटेकर सरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन वंदन करण्यात आले.
श्रीमती परुळेकर म्हणाल्या की, प्रा. नाटेकर यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. शैक्षणिक क्षेत्र हे त्यांचे प्राधान्यक्षेत्र असले तरी त्यांनी त्याच ताकदीने समाजकारण आणि राजकारणही केले. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य उत्तुंग आहे. विद्यादानाबरोबरच शैक्षणिक ग्रंथलेखनही त्यांनी केले. जिल्हा आणि राज्य स्तरावर त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. ते विशिष्ट ध्येयाने राजकीय क्षेत्रात उतरले. अनेक निवडणुका त्यांनी लढवल्या. स्वतंत्र कोकण राज्य निर्मितीसाठी संघर्ष समिती स्थापन करुन त्यांनी एक मोठे आंदोलन उभे केले. वृक्षलागवड आणि पर्यावरणाचे महत्व लक्षात घेऊन त्यांनी वृक्षमित्र सेवा संघाची स्थापना केली. निवृत्तीनंतर सेवानिवृत्तांच्या समस्या सोडवण्यासाठी अथक काम केले. कणकवली तालुका सेवानिवृत्त संघटनेची स्वत:ची वास्तु त्यांनी स्वत: आर्थिक झळ सोसुन उभारली.
समाजसेवा करण्याचे साधन म्हणुन ते राजकारणाकडे वळले, असे सांगून त्या म्हणाल्या की, आम्ही दोघेही एकाचवेळी जिल्हा परिषदेचे सदस्य होतो आणि विरोधी पक्षात होतो. नाटेकर सर त्यावेळी विरोधी पक्षनेता होते. सभागृहात सत्ताधाऱ्यांवर कठोरपणे तुटुन पडणारे नाटेकर सर आणि आम्ही सभा संपल्यानंतर मात्र तेव्हाचे अध्यक्ष आर. बी. दळवी यांच्या दालनात चहासाठी एकत्र येत असू. तेव्हाची राजकीय संस्कृती आजच्यासारखी विकृत झालेली नव्हती, अशी आठवण त्यांनी सांगितली.
प्रास्ताविकात सतीश लळीत यांनी स्मृतीग्रंथ प्रकाशित करण्यामागची भुमिका स्पष्ट केली. नाटेकर सरांचे विविधांगी कार्य एकत्रित करुन त्याचे दस्तावेजीकरण करणे, पुढील पिढ्यांपर्यंत त्यांचे कार्य पोचवणे, यासाठी हा स्मृतिग्रंथ तयार केला आहे. नाटेकर सरांच्या संपर्कात जी माणसे आली, त्यांना ते कसे भावले हे लेखकांच्या शब्दांमधुन वाचकांना वाचायला मिळेल, असे ते म्हणाले.
संपादक डॉ. सई लळीत म्हणाल्या की, माझ्या दृष्टीने नाटेकर सर हे केवळ ‘माझे बाबा’ नव्हते. त्यांच्यात एक समाजवत्सल माणुस दडला होता. अन्याय दिसला की ते पेटुन उठत असत. आयुष्यभर ते अन्याय, भ्रष्टाचार याच्याविरोधात लढले. त्यांचे कार्य आणि आठवणी कायमस्वरुपी शब्दबध्द व्हाव्यात, त्यांच्या कार्याचे दस्तावेजीकरण व्हावे, यासाठी हा स्मृतीग्रंथ काढायचे ठरवले. सरांच्या आठवणी लिहुन पाठवाव्यात, असे आवाहन सर्वांना केले. अनेकांनी मनापासून आत्मियतेने लिहीले. असे २८ लेख या पुस्तकात समाविष्ट केले आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रत्येकाला सर आपल्याला कसे दिसले, कसे भावले, हे आपल्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. यात सामाजिक कार्यकर्ते आहेत, लेखक आहेत, कवी आहेत, पत्रकार आहेत, सरांचे विद्यार्थी आहेत, त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील, चळवळीतील सहकारी आहेत. त्यामुळे अनेक अंगांनी सरांच्या स्वभाववैशिष्ट्यांचं दर्शन या स्मृतीग्रंथातून घडेल.
डॉ. संदीप नाटेकर म्हणाले की, नाटेकर सरांना दूरदृष्टी होती. कोकण विकासाचा ध्यास त्यांनी घेतला होता. कोकणातील नागरिकांचे आर्थिक उत्पन्न वाढवायचे असेल तर बांबुलागवडीसारखे सोपे उपाय योजले पाहिजेत, अशी भुमिका ते घेत. त्यांचे आयुष्य संघर्षमय होते. संघर्ष नसेल तर ते अस्वस्थ होत. एकही दिवस त्यांनी बसुन काढला नाही किंवा आपल्यामागे किती लोक आहेत, याचाही विचार केला नाही. सतत कार्यमग्न राहणे, हा त्यांचा स्थायीभाव होता. स्तृतीग्रंथाच्या माध्यमातून त्यांचा विविधांगी परिचय करुन देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. सई लळीत यांनी श्रीमती कमलताई यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. सतीश लळीत यांनी त्यांना ग्रंथ व भेटवस्तु दिली. डॉ. संदीप नाटेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन इंजि. शुभेन्दू लळीत, अदिती लळीत, प्रतिक नाटेकर यांनी केले.