महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मतमाेजणी केंद्राची जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केली पाहणी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी उद्या शनिवार,२३ नोव्हेंबर, रोजी सकाळी ८ वाजेपासून सुरु होणार आहे. तिनही विधानसभेतील मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी येथील मतमोजणी केंद्रांची पाहणी करुन तयारीचा आढावा घेतला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती ऐश्वर्या काळुशे, जगदीश कातकर, हेमंद निकम, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दिक्षांत देशपांडे, विरसिंग वसावे आणि श्रीधर पाटील आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी सूचना देतांना सांगितले की, भारत निवडणूक आयोगाने मंजूर केलेल्या आराखडाप्रमाणे मतमोजणी टेबल व्यवस्था, तसेच निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या बैठकीची व्यवस्था करावी. मतमोजणी कक्षात अखंडीत विद्युत पुरवठा सुरळीतपणे सुरु राहील याप्रमाणे नियोजन करावे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी. उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधींची बैठकीची व्यवस्था करावी. आवश्यक तेथे लाऊडस्पिकर बसविण्यात यावेत. मतमोजणीच्या अनुषंगाने स्थापन करावयाचे विविध कक्ष, निवडणूक निरीक्षकांची बैठक व्यवस्था, विविध सोयी सुविधांची उभारणी, उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधींसाठी व्यवस्था, मतमोजणी पथके, माध्यम प्रतिनिधींसाठी माध्यम कक्ष, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी, पोलीसांना सुविधा, पोलीस सुरक्षा, वाहनतळाची जागा निश्चिती, वाहतूक वळविणे, कायदा व व्यवस्थेबाबत माहिती घेतली.

कणकवली विधानसभा मतदार संघाची मतमोजणी HPCL हॉल, तळमजला, कणकवली कॉलेज, कणकवली, कुडाळ विधानसभा मतदार संघाची मतमोजणी तहसिल कार्यालय, कुडाळ, सावंतवाडी विधानसभा मतदार संघाची मतमोजणी तहसिल कार्यालय, सावंतवाडी येथे होणार आहे

विधानसभेच्या मतमोजणीसाठी तिनही विधानसभा मतदारसंघानिहाय भारत निवडणूक आयोगाने केंद्रीय मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. यात कणकवलीसाठी परवीनकुमार थिंद, कुडाळसाठी पुष्पराज सिंह आणि सावंतवाडीसाठी प्रशांत आर. यांची नियुक्ती केली आहे. यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

मतमोजणीच्या सुरूवातीस सकाळी ८ वाजता टपाली मतपत्रिकांची व ईटीबीपीएसची मोजणी सुरु होणार आहे. त्यानंतर ८.३० वाजता ईव्हीएमची मतमोजणी सुरु होणार आहे. मतमोजणीची माहिती खालीलप्रमाणे कणकवली- फेरी 24, टेबल 14, कर्मचारी संख्या 250, कुडाळ फेरी 20 टेबल, टेबल 14, कर्मचारी संख्या 260, सावंतवाडी- फेरी 23, टेबल 20, कर्मचारी संख्या 200 मतदान केंद्रात मोबाईलला बंदी

मतदान केंद्रात मोबाईलला बंदी

मतमोजणी केंद्राशेजारी माध्यम प्रतिनिधींसाठी मिडीया कक्ष तर उमेदवार व उमेदवारांचे प्रतिनिधींसाठी कम्युनिकेशन सेंटर तयार करण्यात आले आहेत. मिडीया कक्षात भारत निवडणूक आयोगामार्फत पासेस देण्यात आलेल्या प्रतिनिधींनाच प्रवेश देण्यात येणार आहेत. मतमोजणी केंद्रांत मोबाईलसह इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे मतमोजणी केंद्रात कोणीही मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू आणू नयेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!