आवळेगाव येथे गोठ्याला आग लागून एका जनावराचा मृत्यू तर ४ जनावरे होरपळली

आगीत गोठा व गवताची गंजीसुद्धा जळून खाक

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील आवळेगाव फौजदारवाडी येथील पशुपालक शेतकरी सत्यवान गणपत कानसे यांच्या गुरांच्या गोठ्याला काल दुपारी आग लागून एक जनावर होरपळून जागीच मयत झाले तर 4 जनावरे होरपळली असून शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. घटनास्थळी पंचायत समिती प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी भेट देऊन प्रशासन स्तरावर सहकार्य केले जाईल, असे सांगितले. या आगीत गोठा व गवताची गंजीसुद्धा जळून खाक झाली.

आवळेगाव फोजदारवाडी येथील पशुपालक सत्यवान कानसे यांच्या घरानजिक वनवा लागला होता. हा वनवा वाढत गुरांच्या गोठ्यापर्यंत आला. या गोठ्यात पाच जनावरे होती. यामध्ये म्हैस, रेडे व वासरे यांचा समावेश होता. श्री. कानसे एकटेच घरी होते. आग गोठ्यापर्यत येताच यामध्ये 5 जनावरे होरपळली. एक जागीच मयत झाले. यामध्ये पशुपालकही गुरांना वाचविण्यासाठी प्रयत्न करताना किरकोळ जखमी झाले. याबाबत गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष दादा साईल सरपंच पूर्वा सावंत, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेंद्र देसाई, ग्रामसेविका पेडणेकर, पोलीस पाटील एम. पी. राठोड, तलाठी मनीषा शिपुकडे, उपसरपंच विवेक कुपेरकर, अमित तावडे, ग्रामस्थ यांनी भेट दिली. गटविकास अधिकारी श्री. चव्हाण यांनी कानसे यांना धीर देत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक प्रजित नायर यांना याबाबतची माहिती दिली.

संबंधित कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन हे जनावरच असल्याने या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळलेले आहे. तसेच त्यांचा गोठा जळाला तसेच गवताच्या गंजीला आग लागल्यामुळे या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. श्री. चव्हाण यांनी  जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागमध्ये 40% अनुदानावर दुधाळ जनावरे या पशुपालकासाठी मंजूर करावी, अशी मागणी केली. जो गोठा जळाला त्याला एमआरजीएस मधून पंचायत समितीमधून गोठा देण्याचे आश्वासन दिले. पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विद्यानंद देसाई यांच्याबरोबर चर्चा झाली त्यानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत मधून आवश्यक ते सहकार्य करण्याचे ठरले. या गुरांना पाऊस पडेपर्यंत लागणारा चारा हा ग्रामपंचायत माध्यमातून देण्यासाठी ग्रामपंचायत आवळेगावने पावले उचलली आहेत. होरपळलेल्या गुरावर डॉ. सुरेंद्र देसाई यांनी तात्काळ उपचार सुरू केले आहेत.

आवळेगाव येथील पशुपालक श्री. कानसे यांच्या गोठ्याला लागलेल्या आगीची पाहणी करताना गटविकास अधिकारी विजय चव्हाण, दादा साईल, डॉ. देसाई, सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!