नुकसान ग्रस्थांना तात्काळ भरपाई न मिळाल्यास भाजपा विभागाध्यक्ष राजू हिर्लेकर यांचा आंदोलनाचा इशारा
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील सावडाव खलांत्रीवाडी येथे गेले काही महिने बिबट्याचा उपद्रव वाढला असून, बिबट्याने आतापर्यंत काही जनावरे मारून शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. दरम्यान याबाबत यापूर्वी घटना घडुन देखील वनविभागाकडून कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या नसल्याने भाजपाचे जानवली विभागाध्यक्ष राजू हिर्लेकर यांनी नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. नुकतीच सावडाव खलांत्रीवाडी येथील अनिल सावंत यांची गाय बिबट्याने ठार केली असून त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या पाळीव जनावराच्या नुकसानीची भरपाई वनविभागाने तातडीने शेतकऱ्यांना द्यावी व या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी श्री. हिर्लेकर यांनी केली आहे. यासंदर्भात वनविभागाने तात्काळ दखल न घेतल्यास सावडाव ग्रामस्थांसह वनविभाग कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा देखील श्री हिर्लेकर यांनी दिला आहे. आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात सावडाव येथे चार जनावरे ठार झाली असून त्यामुळे सावडाव ग्रामस्थांमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले आहे. अशी माहिती श्री. हिर्लेकर यांनी दिली.












