लोकशाहीच्या स्तंभामध्ये पत्रकारिता एक पॉवरफुल स्तंभ – जिल्हाधिकारी अनिल पाटील

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : लोकशाहीच्या स्तंभामध्ये पत्रकारिता स्तंभ एक पॉवरफुल स्तंभ आहे. प्रशासन, राजकारण किंवा न्यायमंडळ यांना काही मर्यादा आहेत. पत्रकारांना मर्यादा नाहीत. त्या अनुषंगाने पत्रकारांनी सामाजिक जाणीव राखत लिखाण केले पाहिजे. बॅलन्स राखून पत्रकारिता केल्यास जिल्ह्याचा विकास होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ आयोजित पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.

जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ आयोजित जिल्ह्यातील पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धा सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड मैदानावर बुधवारी आयोजित करण्यात आली होती. दीप प्रज्वलन करून जिल्हाधिकारी पाटील यांनी शुभारंभ केला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शीरस, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियानात सर्वगोड, भाजप जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष उमेश तोरसकर, सचिव बाळ खडपकर, मुख्यालय पत्रकार संघ अध्यक्ष संदीप गावडे, माजी जिल्हाध्यक्ष गणेश जेठे, देवयानी वरसकर, खजिनदार गिरीश परब, नंदकुमार आयरे, विनोद दळवी, विनोद परब, सतीश हरमलकर, दत्तप्रसाद वालावलकर, संजय वालावलकर, मनोज वारंग, तेजस्वी काळसेकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांच्याहस्ते फित कापून, मनीष दळवी यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन झाले. पहिल्या सामन्याची नाणेफेक पोलीस अधीक्षक अग्रवाल यांनी केली. यावेळी बोलताना जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शीरस यांनी जिल्ह्यातील पत्रकारांसाठी क्रीडा पत्रकार पुरस्कार देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे विनंती जिल्हाधिकारी पाटील यांना केली. भाजप जिल्हाध्यक्ष सावंत यांनी बोलताना जिल्ह्यातील पत्रकार गोलंदाजाच्या आणि फील्डिंगच्या भूमिकेमध्ये असतात. ते राजकीय व्यक्ती, प्रशासन यांच्यावर नियंत्रण राखून आहेत. पत्रकारिता करणाऱ्या सगळ्यांची भूमिका जिल्ह्याच्या विकासासाठी खूप महत्त्वाची आहे. २०२४ हे वर्ष निवडणुकीचे होते. पत्रकारांच्या योग्य भूमिकेमुळे हे वर्ष चांगले गेले, असे सांगितले. यावेळी अध्यक्ष संदीप गावडे यांनी मुख्यालय पत्रकार संघाच्या कार्यक्रमांची रूपरेषा स्पष्ट केली.

प्रदर्शनीय सामन्यात विजयी या स्पर्धेपूर्वी पत्रकार विरुद्ध पोलीस यांच्यात प्रदर्शनीय सामना झाला. पोलिसांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले, पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी मैदानात उतरत आपल्यातील खिलाडू वृत्तीचे दर्शन घडविले. हा सामना पत्रकार संघाने जिंकत विजय प्राप्त केला. यानिमित्त दोन्ही संघांना चषक देत जिल्हाधिकारी पाटील व अन्य उपस्थितांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या सामन्यात पत्रकार संघाच्या अमित राणे यांनी सामनावीर पुरस्कार मिळविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!