वेंगुर्ला नगर वाचनालय आयोजित कै.सौ. कुमुदिनी गुरुनाथ सौदागर स्मृती काव्यवाचन स्पर्धेत श्रेयश शिंदे प्रथम

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : नगर वाचनालय, वेंगुर्ले संस्थेतर्फे रविवार दिनांक १६ फेब्रुवारी, २०२५ रोजी कै. सौ. कुमुदिनी गुरुनाथ सौदागर स्मृती काव्यवाचन स्पर्धा संस्थेच्या लक्ष्मीबाई प्रभाकरपंत कोरगांवकर सभागृहात संपन्न झाली. या स्पर्धेला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यातील निवडक २० कवींना कविता सादरीकरणासाठी बोलविण्यात आले होते. यात कळसुली, कणकवली येथील श्रेयश अरविंद शिंदे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर तुळस, वेंगुर्ला येथील अजित वसंत राऊळ यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच कसाल येथील रसिका राजेंद्र तेंडोलकर आणि आचरा, मालवण येथील अनुराधा अनिरुध्द आचरेकर यांना विभागून तृतीय क्रमांक देण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व परीक्षक म्हणून ज्येष्ठ कवी वीरधवल परब व डॉ. शरयू आसोलकर या उपस्थित होत्या.

अनिल श्रीकृष्ण सौदागर हे आपली काकी आणि वेंगुर्ल्याचे पद्मभूषण कवी मंगेश पाडगांवकर यांची सख्खी बहीण कै. सौ. कुमुदिनी गुरुनाथ सौदागर यांच्या स्मरणार्थ नगर वाचनालय वेंगुर्ले येथे सदर काव्यवाचन स्पर्धा आयोजित करतात. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष होते. स्पर्धेला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी स्पर्धकांना मार्गदर्शन करताना डॉ. शरयू आसोलकर म्हणाल्या, कवितेत वेगळेपण केल्याने कविता टिकून राहिल. उद्याच्या कवीचा जन्म अशा स्पर्धेतूनच होत असतो. प्रत्येकाच्या स्वतःत कविता दडलेली असते. तिला प्रकटीकरणासाठी असे कार्यक्रम कारणीभूत ठरतात. यावेळी नगर वाचनालय वेंगुर्ले संस्थेने स्पर्धेसाठी आलेल्या कवितांपैकी निवडक ३० कवितांचे पुस्तक प्रकाशित केले. याबद्दल आयोजकांनी स्पर्धेतील आपला कवितेकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन स्पष्ट केला आहे, असे म्हणत त्यांनी आयोजकांचे कौतुक केले. कवी वीरधवल परब यांनी कवीला आपल्या भावना अभिव्यक्त करता येणे गरजेचे असते. कविता लिहिण्या इतकेच कवीला आपली कविता सादरीकरण करता येणे महत्त्वाचे असते. नगर वाचनालय वेंगुर्ले आयोजित करत असलेली काव्यवाचन स्पर्धा हे या संस्थेचे वेगळेपण आहे. १९६० च्या कवी संमेलनातूनच आरती प्रभू हे कवी पुढे आले. त्यामुळे असे कविता वाचनाचे कार्यक्रम सतत आयोजित करण्यात आले पाहिजेत. चांगल्या प्रकारची कविता करणे खूप कठीण असते, असे म्हणत त्यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देत स्पर्धेला उत्तम कविता ऐकायला मिळाल्याबद्दल सर्व कवींचे अभिनंदनही केले.

या स्पर्धेत विविधांगी व वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणाऱ्या कविता सादर केल्या गेल्या. मराठी सोबत मालवणी बोलीतीलही कवितांचे सादरीकरण यावेळी स्पर्धकांनी केले. या स्पर्धेचे परीक्षण वीरधवल परब, डॉ. शरयू आसोलकर यांनी केले. कार्यक्रमास संस्थेचे कार्योपाध्यक्ष शांताराम बांदेकर, उपकार्यवाह माया परब, कार्यकारी मंडळ सदस्य दिपराज विजितकर, तसेच नाना कांबळी, प्रा. धीरज पाचपिले, प्रा. राम चव्हाण, आरवली-टांक शाळेचे मुख्याध्यापक जाधव, मोहिते व जिल्ह्यातील कवी तसेच संस्थेचे वाचक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यवाह कैवल्य पवार व सूत्रसंचालन महेश बोवलेकर यांनी केले. संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहिर केले.

error: Content is protected !!