भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अविनाश पराडकर यांची माहिती
कुडाळ (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ची पाहणी केली. या महामार्गाबाबत जनतेच्या ज्या तक्रारी होत्या त्या अनुषंगाने केंद्रीय रस्ते व सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दखल घेतली असल्याचे समजते. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह पाहणी केली. भूसंपादन प्रक्रिया, भूसंपादन मोबदला वाटपातील विलंब व वन्य जमिनीच्या मंजूरीस झालेला विलंब यामुळे हे काम वेळेत पूर्ण होवू शकले नाही, परंतु सर्व अडचणींवर मात करून हे काम आता प्रगतीपथावर आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागांतर्गत मुंबई-गोवा महामार्गाची इंदापूर ते झाराप या भागांतील १० पॅकेजेसमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या १० पॅकेजेसची एकूण सुधारित किंमत १५,५६६ कोटी रुपये असून ३५६ किमी लांबीच्या महामार्गावरील २५० किमी मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाची आज पाहणी केली. या प्रकल्पाची एकूण १० पॅकेजेसमध्ये विभागणी करण्यात आली आहे.यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन पॅकेजेस (P-9, P-10)चे जवळपास ९९% काम पूर्ण झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ५ पॅकेजेस असून यापैकी २ पॅकेजेस (P-4, P-8)चे अनुक्रमे ९२% व ९८% काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम प्रगतीपथावर आहे.दोन पॅकेजेस (P-6, P-7)साठी नवीन कंत्राटदाराची नेमणूक करून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. रायगड जिल्ह्यातील तीन पॅकेजेसपैकी दोन पॅकेजेस (P-2, P-3)चे अनुक्रमे ९३% व ८२% काम पूर्ण झाले आहे. पॅकेज (P-1) चे निम्म्याहून अधिक काम पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.