यशाच्या मार्गावर जाण्यासाठी अभ्यासाबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन हवाच: डॉ.योगेश महाडिक.

वामनराव महाडीक विद्यालय तळेरे येथे “विज्ञान जत्रा” संपन्न

तळेरे (प्रतिनिधी) : जर उच्च ध्येय गाठायचे असेल तर अभ्यासाबरोबरच आपण आपल्या जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगायला हवा,असे प्रतिपादन शासकीय तंत्रनिकेतन मालवणचे अधिव्याख्याता डाॅ.योगेश महाडिक यांनी केले. वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच अध्ययन संस्था,मुंबई( कोळोशी) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशालेच्या डॉ.एम.डी देसाई सांस्कृतिक भवनात आयोजित विज्ञान जत्रा कार्यक्रमात ते बोलत होते. प्रशालेच्या इयत्ता पाचवी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या विज्ञान जत्रेमध्ये भाग घेऊन जवळपास 25 प्रयोगांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन मांडण्यात आले.

यावेळी वामनराव महाडीक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयचे प्राचार्य अविनाश मांजरेकर, अध्ययन संस्था,मुंबई शाखा-कोळोशी येथील रसिका कुबडे, दामिनी मराठे, शाळा समिती सदस्य प्रवीण वरुणकर, संतोष जठार, संतोष तळेकर, निलेश सोरप, श्रावणी कम्प्युटरचे संचालक सतीश मदभावे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थीवर्ग व पालक उपस्थित होते.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉ.योगेश विलास महाडीक हे तळेरे गावचे सुपुत्र असून मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय येथे अधिव्याख्याता म्हणून गेली बारा वर्षे कार्यरत असून त्यांनी आपले पदवी ते डॉक्टरेट पर्यंतचे शिक्षण डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल यूनिव्हर्टीसिटी लोणेरे येथे पूर्ण केले तळेरे गावातील सुपुत्राने उच्चविद्याविभूषित पदवी प्राप्त केली. विद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुस्तक देवून डॉ योगेश महाडीक यांचा सत्कार करण्यात आला. येथील कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, प्रत्येकाने आपल्या जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगायला हवा. एखादी प्रयोगाची प्रतिकृती करताना त्याची नाविन्यता काय आहे, त्याची समाजाला काय उपयोगिता आहे,याचा विचार करणे गरजेचे असते. तरच त्या प्रयोगाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त होते. लहान वयापासूनच अभ्यासामध्ये अशी वैज्ञानिक बुद्धी वापरली तर आपण जीवनात उंच भरारी घेऊ शकतो. तसेच महिनाभरापासून विद्यार्थ्यांना प्रयोग देऊन ते प्रत्यक्षात कार्यरत होण्यापर्यंत प्रशालेच्या सहा. शिक्षिका सुचिता सुर्वे यांनी खूप मेहनत घेतली याबद्दल त्यांचे कौतुकही केले.

अध्ययन संस्था मुंबई (शाखा-कोळोशी) येथील रसिका कुबडे म्हणाल्या , विद्यार्थ्यांनी कौशल्य पूर्वक प्रतिकृतींची निर्मिती खूपच सुंदर रित्या केलेल्या आहेत. तसेच अध्ययन संस्था कोळोशी ही अशाच विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम त्या-त्या प्रशालेत जाऊन करते व विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन सक्षम बनवण्याचा प्रयत्न करते. प्राचार्य अविनाश मांजरेकर म्हणाले-पावणेचारशे वर्षांपूर्वी आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास धरून जगावर राज्य केले. अंधश्रद्धेला बळी पडू दिले नाही तसाच आपणही वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगूया व विज्ञानाची कास धरूया.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गावठे एन.पी.व आभार सहा.शिक्षिका सुचिता सुर्वे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!