गोव्यात नाताळपूर्वी भीषण दुर्घटना

अर्पोरा येथील नाइट क्लबला लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू, ५० जखमी

गोवा (प्रतिनिधी) : देशभरातील पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या गोव्यात नाताळपूर्वीच एक भीषण दुर्घटना घडली आहे. उत्तरेकडील अर्पोरा परिसरातील Birch by Romeo Lane या प्रसिद्ध नाइट क्लबला रात्री उशिरा भीषण आग लागली. या आगीत २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, सुमारे ५० जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. जखमींना तातडीने गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मृतांमध्ये ४ पर्यटकांसह १९ नाइट क्लब स्टाफचा समावेश आहे. त्यामुळे दुर्घटनेचे भीषण स्वरूप लक्षात येते. सुरुवातीला या आगीमागे गॅस सिलिंडर स्फोट कारणीभूत असल्याचे समजत होते. मात्र स्थानिकांनी कोणताही स्फोटाचा आवाज न ऐकला असल्याचे सांगितल्याने तपास यंत्रणांनी अन्य कारणांचाही शोध सुरू केला आहे.

फटाके, सेलिब्रेशनसाठी वापरले जाणारे रसायन किंवा धोकादायक साहित्याची साठवणूक—या सर्व शक्यता तपासात आहेत. काही अधिकाऱ्यांच्या मते, एलपीजी सिलिंडर स्फोटामुळेही आग भडकली असावी. त्यामुळे सर्व अंगांनी सखोल तपास सुरू आहे.

दरम्यान, गोवा सरकारने तसेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. सुरक्षा निकषांचे उल्लंघन झाले का? नाइट क्लबमध्ये अग्निसुरक्षेची पुरेशी व्यवस्था होती का? याबाबत सर्वंकष तपास सुरू असून पुढील काही तासांत महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!