पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन सतर्क
बोगस खते, औषधे, कीटकनाशके विक्री विरोधात कृषी विभागाची धडक कारवाई सुरू
देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील कातवण येथील मे. सुखकर्ता कृषी सेवा केंद्रावर कृषी विभागाने केलेल्या तपासणीत परवानाधारक परिसराव्यतिरिक्त अन्य ठिकाणी विनापरवाना साठवून ठेवलेला सुमारे ५५ लाख १० हजार रुपये किमतीचा कीटकनाशक साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत एकूण ६.५ मेट्रिक टन कीटकनाशकांचा साठा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी देवगड पोलीस ठाण्यात कीटकनाशके कायदा १९६८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. २८ नोव्हेंबर २०२६ रोजी कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) मानसी पवार या नियमित तपासणीसाठी कातवण येथील मे. सुखकर्ता कृषी सेवा केंद्रात गेल्या असता, तपासणीदरम्यान परवानाधारक परिसर सोडून अन्य ठिकाणी कीटकनाशकांचा साठा विनापरवाना केल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांनी जिल्हा भरारी पथकाला पाचारण केले. पथकाने घटनास्थळी पंचनामा करून ६.५ मेट्रिक टन कीटकनाशकांचा, अंदाजे ५५.१० लाख रुपये किमतीचा साठा जप्त केला.
या प्रकरणी राहुल राजेश जोईल (रा. कातवण, ता. देवगड) यांच्याविरोधात कृषी अधिकारी मानसी पवार यांच्या फिर्यादीवरून देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे मोहीम अधिकारी राहुल माने, तालुका कृषी अधिकारी आरती पाटील, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सुशांत भोसले आणि कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) मानसी पवार यांच्या पथकाने केली.
महाराष्ट्र राज्याचे संचालक (निवगुनि) सुनील बोरकर, कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, सिंधुदुर्गच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, कृषी विकास अधिकारी दिशांत कोळप आणि कोकण विभागाचे तंत्र अधिकारी (गुणनियंत्रण) अजिंक्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.












