ह्युमन राईट असोसिएशनच्या कणकवली तालुकाध्यक्षपदी मंगेश चव्हाण यांची सलग तिसऱ्या वर्षी निवड!

स्पेक्टोमार्ट ऑप्टिकल्सचे संचालक मंगेश चव्हाण यांच्या सामाजिक कार्याची दखल; आकुर्डी, पुणे येथील मुख्य कार्यालयातून नियुक्ती जाहीर

कणकवली (प्रतिनिधी) : सामाजिक कार्य, जनसेवा आणि संघटनात्मक योगदानाच्या जोरावर आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे स्पेक्टोमार्ट ऑप्टिकल्स, कणकवलीचे संचालक मंगेश चव्हाण यांची ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या कणकवली तालुकाध्यक्षपदी सलग तिसऱ्या वर्षी निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या आकुर्डी, पुणे येथील मुख्य कार्यालयातून त्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यांच्या या निवडीमुळे कणकवली तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील आंब्रड येथील रहिवासी असलेले मंगेश चव्हाण सध्या कणकवली येथील बिजलीनगरमध्ये वास्तव्यास आहेत. ते स्पेक्टोमार्ट ऑप्टिकल्स, कणकवलीचे संचालक म्हणून कार्यरत असून, सिंधुदुर्ग ऑप्टिकल वेल्फेअर असोसिएशनचे जिल्हा सचिव म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.

संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. चौधरी, राष्ट्रीय सचिव प्रमोद केसरकर, राष्ट्रीय निरीक्षक रामदास खोत, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष लक्ष्मण दवणे, महाराष्ट्र राज्य निरीक्षक घनश्याम सांडीम, कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक आणि कोकण विभागीय सचिव प्रणव बांदिवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड जाहीर करण्यात आली.

मंगेश चव्हाण हे युवा उद्योजक म्हणून परिचित असून, त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना ‘कोकणशाहीचा कोकणरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी मोफत नेत्रतपासणी शिबिरांचे आयोजन करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. तसेच कोविड काळात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले असून, जिल्ह्यातील विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

स्पेक्टोमार्ट ऑप्टिकल्सच्या माध्यमातून सावंतवाडी, बांदा, आरोंदा, शिरोडा, वैभववाडी, मालवण, जामसंडे आणि शिरगाव येथे सेवा शाखा कार्यरत आहेत. या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे.

त्यांच्या सामाजिक, व्यावसायिक आणि संघटनात्मक कार्याची दखल घेत ह्युमन राईट असोसिएशनच्या राष्ट्रीय, महाराष्ट्र राज्य व कोकण विभागीय कार्यकारिणीने त्यांच्यावर पुन्हा एकदा कणकवली तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.

मंगेश चव्हाण यांना नियुक्तीपत्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा सेवानिवृत्त निवासी नायब तहसीलदार दिलीप पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, कोकण विभागीय सचिव तथा एकदंत फूड अँड बेव्हरेजिसचे संचालक प्रणय बांदिवडेकर, ट्रॉफी हाऊसचे संचालक महेंद्र चव्हाण, अक्षय शिंदे, सौ. सान्वी चिंदरकर आणि जितेश कदम उपस्थित होते.

सलग तिसऱ्या वर्षी तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मंगेश चव्हाण यांचे विविध क्षेत्रांतील मान्यवर, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!