सर्वपक्षीय आघाड्यांचीसुद्धा अनेक ठिकाणी चलती !
ब्युरो न्युज : राज्यातील 147 पैकी 76 कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर महाविकास आघाडीने झेंडा फडकावला आहे. सत्ताधारी शिंदे आणि भाजप गटाला अवघ्या 31 बाजार समित्यांमध्ये विजय (सायंकाळी 5 पर्यंतची आकडेवारीनुसार) प्राप्त झाला आहे. सत्तेसाठी काही पण म्हणून सर्वपक्षीय आघाड्यांनी सुद्धा 24 ठिकाणी विजय मिळवत मोठी मजल मारली आहे. राज्यातील बहुतांश नेत्यांनी आपापले बाजार समित्यांमध्ये गड राखले आहेत.
दरम्यान, बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे, नाशिक जिल्ह्यात मंत्री दादा भूसे यासारख्या नेत्यांच्या गटाला पराभवाचा धक्का बसला आहे. काही ठिकाणी सत्तेसाठी निर्माण झालेल्या अभद्र युत्यांना सुद्धा मतदारांनी नाकारल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राज्यातील निकालामध्ये संमिश्र यश उमटलं आहे. विदर्भातील रामटेक, नागपूरमधील सुनिल केदार, आशिष जायस्वाल यांच्या अभद्र युतीला त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या पॅनलने केलेला पराभव चर्चेचा विषय ठरला आहे. चंद्रपुरात खासदार बाळू धानोरकर यांना मोठा धक्का बसला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या युतीने बाजी मारली. नगरमध्ये विखे पाटील गटाला बाळासाहेब थोरातांनी धक्का देत भोपळाही फोडू दिला नाही.