सक्षम विद्यार्थी घडवून उद्याचा महाराष्ट्र, उद्याचा भारत घडवायचाय – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांचा पाया मजबूत असेल तर ते अधिक सक्षम घडतात. या सक्षम विद्यार्थ्यांच्या माध्यमातून उद्याचा महाराष्ट्र, उद्याचा भारत घडवायचा आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले.बांदा येथील शाळा क्रमांक 1 मध्ये पहिले पाऊल शाळा पूर्व मेळाव्याचे उद्घाटन केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रधान सचिव रणजितसिंह देओल, प्रकल्प संचालक कैलास पगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख आदी उपस्थित होते. शालेय शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले, जगाचं नेतृत्व भारताने करावं, हे स्वप्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाहिलं आहे. त्यासाठी शिक्षणातील विद्यार्थ्यांचा पाया मजबूत व्हायला हवा. भारताने जगाचे नेतृत्वं करायचे असेल तर युवकांमध्ये कौशल्य वाढविले पाहिजे. आपला देश तरुण आहे. हे आव्हान स्वीकारायला हवं. विद्यार्थी हा नेहमीचा माझा केंद्रबिंदू राहिला आहे. 61 हजार शिक्षक मूळ प्रवाहात आले. शिक्षकांवर 5 हजार 500 कोटी खर्च केले जाणार आहेत. सर्वच विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार आहे. त्याचबरोबर बुट आणि मौजे देण्याची व्यवस्था केली जात आहे. सरकारवर आणि सरकारच्या तिजोरीवर पहिला हक्क मुलांचा आहे. शिक्षकांनीही उत्कृष्ट शिकवावे. राज्याची सुरुवात बांद्यातून झाली आहे. हीच शाळा सर्वोत्कृष्ट व्हायला हवी. पीएमसी खाली 1 कोटी 85 लाख रुपये उपलब्ध करुन दिले जातील. त्याचबरोबर 2 स्कूल बसेस दिले जातील. 500 मुलांचे वसतिगृह असणारी शाळा आंबोलीत उभारणार आहे. भविष्यात मराठीत शिकणारे डॉक्टर, इंजिनियर असतील. बांद्याची शाळा मॉडेल स्कूल बनवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्रधान सचिव देओल म्हणाले, मागील वर्षी या अभियानात 9 लाख महिलांचा सहभाग होता. 2 लाख 50 हजार गट तयार झाले. मागील वर्षी याचा चांगला फायदा झाला. यावर्षीही मुलांची संख्या निश्चितपणे वाढेल. विद्यार्थ्यांचा पाया पक्का करणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, हा या अभियानाचा उद्देश आहे. यावेळी पगारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांच्या हस्ते यावेळीही विविध स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर माझी ई- शाळा डिजिटल शाळा दालनाचे उद्घाटन करण्यात आले. सेतू, उमलती भाव संवेदना, सोनेरी क्षण कात्रण संग्रह आणि घडीपत्रिकेचे प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी केले. तर प्राचार्य अनुपमा तावशीकर यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!