मंत्री नितेश राणेंची गव्हरमेन्ट नर्सेस फेडरशेन पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट
कणकवली (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांची महाराष्ट्र गव्हरमेन्ट नर्सेस फेडरेशन च्या पदाधिकाऱ्यांकडून कणकवली येथे सदिच्छा भेट घेण्यात आली. पालकमंत्री नितेश राणे यांच्या कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी घेतलेल्या भेटीदरम्यान गव्हरमेन्ट नर्सेस फेडरेशनच्या वतीने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागातील प्रशासकीय बदल्या रद्द करण्याबाबत मंत्री नितेश राणे यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणी, कौटुंबिक समस्या तसेच सेवेत निर्माण होणाऱ्या अडथळ्यांची माहिती शिष्टमंडळाकडून नामदार नितेश राणेंसमोर मांडण्यात आली. तसेच राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री यांच्याकडे या विषयासंदर्भात सकारात्मक शिफारस करावी, अशी विनंतीही नामदार नितेश राणे यांच्याकडे करण्यात आली. नर्सेस फेडरेशन च्या पदाधिकाऱ्यांशी चर्चेदरम्यान मंत्री नितेश राणे यांनी शासकीय आरोग्य विभागाचे नर्सेस तसेच कर्मचारी अत्यंत तळमळीने गरजू रुग्णांना सेवा देतात. गंभीर स्थितीतील रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. त्यामुळे नर्सेस तसेच कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक अडचणी तसेच अन्य बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून धोरण ठरविण्यासाठी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांकडे आवश्यक शिफारस करेन अशी ग्वाही नर्सेस फेडरेशन च्या पदाधिकाऱ्यांना दिली. यावेळी सिंधुदुर्ग गव्हरमेन्ट नर्सेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रणया तांडेल, उपाध्यक्ष दिया बांधेकर (सार्वजनिक आरोग्य), उपाध्यक्ष सारिका राणे (वैद्यकीय शिक्षण), सचिव अनघा बागवे (सार्वजनिक आरोग्य), सचिव स्वप्निल खुले (वैद्यकीय शिक्षण) तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.











