धान्य गोदामातील कामे खाजगी कामगारांकडे देण्यास विरोध; माथाडी कामगार आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शासकीय धान्य गोदामातील कार्यरत माथाडी कामगारां ऐवजी वाहतूकदारांच्या अ नोंदीत कामगारांकडून धान्य भराई व उतराईची कामे करून घेण्याच्या शासन निर्णयाविरोधात राज्यभरातील माथाडी कामगारांनी आंदोलन उभारले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माथाडी कामगारांनी कामबंद ठेऊन येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याकडे लक्ष वेधण्यासाठी दोन दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन सुरू केले आहे.
शासनमान्य धान्य गोदामातील धान्य उतरणे व भरणे तसेच धान्याचे मोजमाप करणे, दुकानाच्या ठिकाणी धान्य उतरविणे इत्यादी कामे माथाडी कामगारांमार्फत करून घेतली जातात. मात्र शासनाने आता धान्य शासकीय गोदामात न उतरवता थेट धान्य दुकानात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. हे धान्य भरण्याचे व उतरविण्याचे काम वाहतूकदाराकडून खाजगी कामगार यांच्याकडून करून घेतले जाणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. माथाडी कामगारांना आता कामच उरलेले नाही. कित्येक वर्ष माथाडी कामगार म्हणून कार्यरत असणाऱ्या कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. याला शासन जबाबदार आहे. तसेच मजुरीची व लेवीची रक्कम संबंधित कंत्राटदाराकडून माथाडी मंडळाकडे वेळीच भरणा केली जात नसल्याने या रकमेत गैरव्यवहार होण्याचा शक्यता निर्माण झाली आहे.तरी या शासन निर्णया विरोधात भारतीय माथाडी सुरक्षा रक्षक श्रमजीवी आणि जनरल कामगार युनियन च्या वतीने राज्यव्यापी आंदोलन उभारले आहे. माथाडी कामगारांना देशोधडीला लावणारा शासन निर्णय तात्काळ मागे घेऊन योग्य तो निर्णय न झाल्यास २७ मे पासून बेमुदत काम बंद आंदोलन छेडणार असल्याचा इशारा माथाडी कामगार संघटनेकडून देण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८५ माथाडी कामगार शासकीय धान्य गोदामात अनेक वर्षापासून काम करत असून या सर्व कामगारांवर नवीन शासन निर्णयामुळे उपासमारीची वेळ येणार आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी आज संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये सरचिटणीस सुनील मयेकर, शंकर गुरव, नंदकिशोर घाडीगावकर, नारायण शेल्टे, गंगाराम वारंग, यशवंत खडपकर, शंकर सुतार यांच्यासह मोठ्या संख्येने माथाडी कामगार सहभागी झाले आहेत. जोपर्यंत याबाबत शासन योग्य तो निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा घेतला आहे.
पुरवठा अधिकाऱ्यांची भेट
माथाडी कामगारांनी पुकारलेल्या आंदोलन स्थळी जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे ,सहाय्यक पुरवठा अधिकारी मनीषा फटाले यांनी भेट देत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व आपल्या मागण्या शासन स्तरावरील असल्याने आपले निवेदन शासनाला तात्काळ सादर करण्यात येईल. असे आश्वासन दिले. याबाबतचे पत्र माथाडी कामगारांना देण्यात आले.














