खारेपाटण (प्रतिनिधी) : शालेय मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जनजागृती व्हावी,तसेच शालेय विद्यार्थिनींना स्वच्छता व आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने MNGL यांच्या CSR निधीतून अनुसया महिला स्वयंसेवी संस्था,रत्नागिरी यांच्या माध्यमातून विविध शाळांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत खारेपाटण हायस्कूल ला सॅनिटरी पॅड, सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन तसेच इन्सिनरेटर नुकतेच उपलब्ध करून देण्यात आले.
शालेय विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या काळात स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक सुविधा शाळेच्या पातळीवरच उपलब्ध व्हाव्यात, तसेच वापरलेल्या सॅनिटरी पॅडची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावता यावी, यासाठी या साहित्याचा मोठा उपयोग होणार आहे.या कार्यक्रमाला अनुसया महिला स्वयंसेवी संस्था,रत्नागिरीच्या अध्यक्षा आदरणीय निलम पालव मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. पालव मॅडम यांनी उपस्थित शाळांतील शिक्षकवर्गाला मासिक पाळी व्यवस्थापन,वैयक्तिक स्वच्छता,विद्यार्थिनींचे आरोग्य आणि मासिक पाळीविषयी योग्य जनजागृती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
तर मासिक पाळी ही मुलींच्या जीवनातील नैसर्गिक प्रक्रिया असून त्याबाबत विद्यार्थिनींमध्ये कोणताही संकोच किंवा गैरसमज राहू नये, यासाठी शाळा आणि शिक्षकांची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचे प्रशिक्षणातून स्पष्ट करण्यात आले. विद्यार्थिनींना योग्य माहिती देणे, स्वच्छतेच्या सवयी लावणे आणि त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना आवश्यक सहकार्य करणे, याबाबतही शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमाला शेठ न. म. विद्यालय, खारेपाटण येथून कु. दर्शना पाताडे उपस्थित होत्या. यावेळी प्रशालेक वतीने त्यांनी शाळेसाठी सॅनिटरी पॅड, सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन आणि इन्सिनरेटर मान्यवरण हस्ते स्वीकारण्यात आले.
शाळांमध्ये सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थिनींना गरजेच्या वेळी सॅनिटरी पॅड सहज उपलब्ध होणार आहेत. तसेच इन्सिनरेटरच्या माध्यमातून वापरलेल्या सॅनिटरी पॅडची सुरक्षित व योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शाळेतील स्वच्छता राखण्याबरोबरच विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. MNGLच्या CSR निधीतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण व शालेय स्तरावर मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार असून, विद्यार्थिनींना आवश्यक स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.











