ओरोस समर्थनगर येथे श्रमदानातून बंधारा पूर्ण; अधिकाऱ्यांनी हाती घेतली फावडी!

ओरोस समर्थनगर येथे श्रमदानातून बंधारा पूर्ण; मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांचाही सहभाग

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या स्वीय सेवेत कार्यरत असलेले स्वीय सहायक, परिचर आणि वाहनचालक यांनी एकत्र येत ओरोस समर्थनगर येथील महत्त्वाच्या ठिकाणी श्रमदानातून बंधारा उभारला. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी स्वतः हातात फावडे घेऊन माती भरण्याचे काम केले. अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नांतून हा बंधारा पूर्ण करण्यात आला.

जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या कामांना गती देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून ओरोस समर्थनगर येथील बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, उपाध्यक्ष तुकाराम ऊर्फ दादा साईल तसेच विविध विषय समित्यांच्या सभापतींच्या स्वीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबविला.

Bएरवी जिल्हा परिषद पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजात व्यस्त असणारे स्वीय सहायक, परिचर आणि वाहनचालक या वेळी जलसंधारणाच्या कामासाठी एकवटले. त्यांनी प्रत्यक्ष श्रमदान करीत बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास नेले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बासुर यांनीही केवळ उपस्थिती न दर्शविता स्वतः फावडे हातात घेऊन कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून माती भरण्याचे काम केले. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

या उपक्रमाला जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम ऊर्फ दादा साईल, जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया वालावलकर, जिल्हा परिषद माजी तथा विद्यमान सदस्य अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, जिल्हा परिषद सदस्य नागेश आहीर, पंचायत समिती सदस्य अमित भोगले, ओरोसचे उपसरपंच पांडुरंग मालवणकर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी सक्रिय पाठबळ दिले. शिवराम केणी, महादेव परब, नागेश मालवणकर, सुधीर मालवणकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यात लोकसहभागातून वनराई व कच्चे बंधारे उभारण्यावर भर दिला जात आहे. समर्थनगर येथील बंधाऱ्याच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेत या मोहिमेला कृतीतून हातभार लावला. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविणे आणि स्थानिक पातळीवर जलसंधारणाला चालना देणे, या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

error: Content is protected !!