पायाभूत सुविधांसाठी 50 लाखांचा निधी
सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी येथील आठवडा बाजार गोदाम परिसरातच निश्चित करण्यात आला आहे. त्यासाठी ५० लाखाचा खर्च करण्यात येणार असून आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच पावसाळ्यात व्यापाऱ्यांच्या अंगावर पाणी पडू नये यासाठी शेल्टर उभारले जाणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे हॉकर्स संघटनेच्या बैठकीत दिली. यावेळी बाहेरून येवून गाड्या लावून कायम व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना रोखण्यात यावे, अशी मागणी यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. आठवडा बाजाराच्या पार्श्वभूमीवर आज केसरकर यांनी हॉकर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी केसरकर म्हणाले, आठवडा बाजार हा गोदामाच्या परिसरातील जागेत योग्य ठरणार आहे. काही सुविधांचा अभाव आहे. त्यासाठी ५० लाख रुपये देण्यात येणार आहे. त्या निधीतून परिसरात डांबरीकरण, गटार आदी व्यवस्था करण्यात येणार आहे. दुसरीकडे व्यापाऱ्यांना बसण्यासाठी माझ्या खर्चाने तात्पुरते शेल्टर देण्यात येणार आहे.