2024 मध्ये पुन्हा येणार भाजपा सरकार
आमदार नितेश राणेंनी व्यक्त केला विश्वास
कणकवली (प्रतिनिधी) : पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील 9 वर्षांत भारताने जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेने जोरदार वाटचाल सुरू ठेवली आहे.सर्वसामान्य नागरिकांपासून सर्व स्तरातील जनतेचा सर्वांगीण विकास हा मागील 9 वर्षांत झाला आहे.त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत फिर एक बार मोदी सरकार येणार असल्याचा विश्वास भाजपा आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. माजी खा.निलेश राणे , भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील मागील 9 वर्षांच्या काळातील भारताचा विकास यावर कणकवलीत पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने महासत्तेच्या दिशेने घोडदौड सांगण्यात आली.यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, मनोज रावराणे, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,आनंद शिरवळकर, माजी उपसभापती दिलीप तळेकर उपस्थित होते. 2014 पासून आजपर्यंत मागील 9 वर्षांत असंख्य गरीब कल्याणकारी निर्णय घेण्यात आले.शेतकरी सन्मान, महिलांना आर्थिक सक्षमीकरण, युवकांना रोजगार, सबका साथ सबका विकास योजनेतून कल्याणकारी निर्णय घेण्यात आले.काँग्रेस सरकारच्या काळात योजना जाहीर व्हायच्या पण त्याचा पैसे लालफितीत अडकून पडायचे. पंतप्रधान मोदींनी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले.प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून मच्छीमाराना सर्वंकष दिलासा दिला. 2014 पूर्वी मच्छीमारांसाठी किरकोळ लाभ मिळत होते. मात्र पंतप्रधान मोदींनी मच्छीमाराना भरीव आर्थिक सहकार्य केले.रस्ते विकास , मुंबई गोवा हायवे चौपदरीकरण पंतप्रधान मोदींच्या काळात शक्य झाले.मुद्रा योजनेतून उद्योगधंद्यांसाठी अर्थ पुरवठा केला. पंतप्रधान आवास योजना याद्वारे प्रत्येक नागरिकाला स्वमालकीचे घर दिले. प्रत्येक धर्म आणि जातींसाठी विकास योजना राबविल्या.ना खाऊंगा ना खाने दुगा म्हणत भ्रष्टाचाराला आळा घातला. कोव्हीड काळात जग संकटात असताना भारत देशाने लस तयार करून जगभरात पाठविल्या. जगात भारताबद्दल आज सन्मान निर्माण झाला आहे.अन्य राष्ट्रे भारताबद्दल गौरवोद्गार करतात. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मोदींची ऑटोग्राफ घेतली. ऑस्ट्रेलियात मोदी इज बॉस म्हटले जाते.युक्रेन आणि रशिया तील युद्धावर पंतप्रधान मोदी तोडगा काढू शकतात अशी वातावरण निर्मिती जगात आहे. मागील 9 वर्षांत आपल्या महाराष्ट्र आणि कोकणसाठी भरभरून निधी मिळाला. केंद्र शासनाच्या विविध योजनांद्वारे स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला. पंतप्रधान ग्रामसडक योजना, स्मार्ट सिटी सारख्या महत्वाकांक्षी योजना सुरू झाल्या.रेल्वेचा विकास झालाच सोबत वंदे मातरम, तेजस , बुलेट ट्रेन, मेट्रो ट्रेन मुळे वेगळा बदल झालेत.देशाला प्रगतीपथावर नेण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी मागील 9 वर्षांत केले.देशातील जनता फिर एक बार मोदी सरकार म्हणत भाजपाला 2024 च्या निवडणुकांत निवडून देईल असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.