सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा

काळसेचा रविराज शंकर नार्वेकर ठरला जिल्ह्यातील पहिला नेवल आर्किटेक्ट पदवी घेणारा विद्यार्थी

चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील काळसे ( बागवडी) गावचा सुपुत्र कु. रविराज शंकर नार्वेकर हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला नेव्हल आर्किटेक्ट ठरला आहे. रविराज याने चेन्नई मधील AMET युनिव्हर्सिटी मधून ही पदवी प्राप्त केली आहे.रविराज हा बंदर विभागाचे कर्मचारी शंकर उर्फ भाऊ नार्वेकर आणि सर्व शिक्षा अभियानच्या तज्ञ शिक्षिका गौरी नार्वेकर यांचा सुपुत्र आहे. कु.रविराज याने कुडाळ हायस्कूलच्या इंग्लिश मीडियम स्कूल मधून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नेव्हल आर्किटेक्ट चे शिक्षण चेन्नई येथील AMET युनिव्हर्सिटीच्या अकॅडमी ऑफ मरीन एज्युकेशन अँड ट्रेनिंग मध्ये घेतले. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून रविराज हा नेव्हल आर्किटेक्ट परीक्षेत पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. विशेष म्हणजे हे शिक्षण घेणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तो पहिला विद्यार्थी ठरला आहे. याबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. रविराज च्या या यशात त्याचे आई-वडिल व कुटुंबीयांचा फार मोठा सहभाग आहे. तसेच कुडाळ हायस्कूल व इंग्लिश मीडियम च्या सर्व शिक्षक यांचाही बहुमोल वाटा आहे. यानंतर रवीराजने त्याचे काका पिंट्या नार्वेकर यांचा काळसे बागवाडी येथे असलेला बोट बांधणी व्यवसाय नवनवीन तंत्रज्ञान वापरून या व्यवसायाला मोठे स्वरूप देण्याचा मानस व्यक्त केला आहे. याबरोबरच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित सोहळ्यात भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांच्या हस्ते रविराज नार्वेकर याचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!