देशातील सर्वोत्तम अधिकाऱ्यांमध्ये आपल्या भागातील अधिकारी गेला याचा अभिमान- आ. वैभव नाईक

युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तुषार पवार याचा छ.शिवाजी महाराज उत्कर्ष मंडळातर्फे सत्कार

भारत देशाचे नाव उज्वल करण्याची तुषार पवार याला संधी -तहसीलदार रमेश पवार

शासन आणि जनतेमधील दुवा म्हणून यशस्वीरित्या काम करणार- तुषार पवार

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीतील छ. शिवाजी महाराज नगर हा सदन, संपन्न आणि सांस्कृतिक दृष्ट्या अग्रेसर असलेला भाग आहे.सुसंस्कृत लोकांची वस्ती याठिकाणी आहे. याच भागातील तुषार पवार याने युपीएससी परीक्षेत उत्तुंग यश संपादित करून कणकवली आणि शिवाजी नगरच्या इतिहासात आपले नाव कोरले आहे. देशातील सर्वोत्तम अधिकाऱ्यांमध्ये आपल्या भागातील अधिकारी गेला याचा आपल्याला अभिमान आहे. अतिशय खडतर परिस्थितीत त्याने हे यश मिळविले आहे. सर्वानी मिळून तुषारचा नागरी सत्कार करावयाचा आहे. तुषारचा आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे.आपण ज्या परिस्थितीतुन आलो त्याच परिस्थितीत अनेक लोक आहेत. त्यांना पुढे आणण्याचे काम अधिकारी म्हणून काम करताना तुषारने करावे. असे प्रतिपादन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केले.

युपीएससी परीक्षेत भारतातून ८६१ वी रँक प्राप्त केलेल्या तुषार दीपक पवार याचा कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराज उत्कर्ष मंडळातर्फे छ. शिवाजी महाराज नगर येथे आज सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार वैभव नाईक बोलत होते.यावेळी कणकवलीचे तहसीलदार रमेश पवार,सत्कार मूर्ती तुषार पवार, माजी नगरसेवक सुशांत नाईक, मालवणचे माजी नगरसेवक नितीन वाळके, मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र वर्णे, उमेश वाळके,अशोक मर्गज,महेंद्र कुमार मुरकर, सूर्यकांत घाडी,हनीफ पिरखान, चेतन ताम्हणकर,गोपाल वावळीये,स्मिता म्हापसेकर कल्पना मलिये, सत्कार मूर्ती तुषारचे आई,वडील तसेच छत्रपती शिवाजी महाराज उत्कर्ष नगर येथील नागरिक उपस्थित होते.

यावेळी तहसीलदार रमेश पवार म्हणाले, युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होणे खूप अवघड गोष्ट आहे. लाखो करोडो विद्यार्थी परीक्षेसाठी प्रयत्न करतात परंतु त्यातील काही विद्यार्थांचीच यामध्ये निवड होते. तुषार पवार याने या परीक्षेत उत्तीर्ण होऊन आपल्या गावाचे,तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नावलौकिक केले. आता भारत देशाचे नाव उज्वल करण्याची संधी त्याला मिळाली आहे. त्याने सर्वसामान्य व्यक्ती नजरेसमोर ठेवून काम केल्यास त्याची कारकीर्दही उज्ज्वल होईल.कला, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात कणकवली अव्वल आहे. तुषार पवार याने कणकवलीच्या इतिहासात अजून एक मानाचा तुरा रोवला आहे.

सत्कार मूर्ती तुषार पवार म्हणाले, युपीएससीची दोन वेळ परीक्षा दिली परंतु त्यात यश आले नाही.ज्या चुका होत होत्या त्यावर काम करून परीक्षा पास होण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि त्याचे फलित झाले आहे. त्यासाठी आई वडिलांचेही तेवढेच सहकार्य लाभले. शरद कृषी भवन येथील आमदार वैभव नाईक यांच्या एका कार्यक्रमात भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी अविनाश धर्माधिकारी आले त्यांनी कोकणातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत स्तुती केली. त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो या कार्यक्रमातून प्रेरणा मिळाली. आणि आज जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांनी युपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. आपण सिंधुदुर्गात राहूनही या परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो. लोकसेवा हि सेवा आहे तो जॉब नाही आहे. लोकाभिमुख सेवा देण्यासाठी शासन आणि जनते मधील दुवा म्हणून यशस्वी रित्या काम करणार असल्याचे त्याने सांगितले.

तुषार याचे वडील कणकवली येथील खरेदी विक्री संघात काम करतात तर आई घरी शिवणकाम करते. प्रतिकूल परिस्थितीत त्याने शिक्षण घेत ही मजल मारली आहे. या मुलाच्या आई वडिलांचे विशेष कौतुक करावं लागेल त्यांनी त्याला पाठबळ दिले म्हणूनच त्याने कठोर परिश्रम घेवून हे यश संपादन केल्याचे सांगत नितीन वाळके,अभय खडपकर, माजी नगरसेवक सुशांत नाईक व इतर मान्यवरांनी तुषारचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अभय खडपकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!