भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती
ओराेस (प्रतिनिधी) : 27 जुलै 2023 रोजी देशात किसान समृद्धीचा एक नवा अध्याय रचला जात आहे. देशात सुमारे सव्वा लाखाहून अधिक “प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र” उद्यापासून कार्यान्वित होत आहेत. त्यातील 14 हजार 429 केंद्रे महाराष्ट्र राज्यात तर 156 केंद्रे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होत आहेत. योजनेचे उदघाटन २७ जुलै रोजी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजस्थान येथून होणार असून या प्रसंगी 8.50 कोटी पीएम किसान लाभार्थी यांना 14 व्या हप्त्याचे हस्तांतरण होणार आहे. यावेळी ते शेतकऱ्यांशी सुसंवाद साधणार आहेत, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी भा दिली.
सिंधुदुर्गनगरी येथील वसंत स्मृती भवन या भाजपच्या जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषद घेत सावंत यांनी ही माहिती दिली. यावेळी मावळते जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल आदी उपस्थित होते. यामुळे शेतक-यांना शेतीसाठी लागणारी बी-बियाणे, औषधे, औजारे, खते यांच्या खरेदीसह मातीपरीक्षण, संशोधन आणि मार्गदर्शन एकाच छताखाली मिळणार आहे. सुरू होणाऱ्या ‘पंतप्रधान किसान सुविधा केंद्र’ येथे ही सुविधा मिळणार असल्याचे यावेळी सावंत यांनी सांगितले.