सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आणि ते प्रथमच जिल्ह्यात दाखल झाल्याने त्यांचा आज सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्यानंतर माननीय नितेश राणे हे प्रथमच जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. त्यांचे जिल्ह्यात विविध ठिकाणी भाजप पक्षाच्या वतीने भव्य स्वागत व सत्कार करण्यात आले. त्यांचे सिंधुदुर्गनगरी येथे आगमन होताच फटाक्यांचे आतषबाजी आणि ढोल ताशांचा गजर करत भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मंत्री नितेश राणे यांनी ओरोस फाटा येथील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा भाजप कार्यालयात त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपचे पदाधिकारी दादा साईल, अशोक सावंत, सरोज परब, संध्या तेरसे, वंदना किनळेकर, नीता राणे, संतोष वालावलकर, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. यावेळी नितेश राणे यांनी आपल्या सर्वांचे प्रेम आणि मेहनत यामुळे आमदार आणि आता मंत्री झालो हे मी कायम लक्षात ठेवीन. आपल्या अपेक्षा जाणून घेऊन त्या दृष्टीने जिल्ह्याचा विकास केला जाईल. जिल्ह्याच्या विकासात कोणतीही कमतरता राहणार नाही. जिल्ह्याच्या विकासाबरोबर पक्षाचे काम अधिक प्रभावी करण्यासाठी आपण सर्वांनी साथ द्या. असे अभिवादन केले.