सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने मंत्री नितेश राणेंचा भव्य सत्कार
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि शासन यातील दुवा म्हणून मी आपले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन, या बँकेची वाटचाल अधिक जोमाने व्हावी यासाठी आपल्या मधील संवाद महत्त्वाचा आहे. आपल्या समस्या आणि प्रश्नांसाठी माझ्याशी थेट संवाद साधा जास्तीत जास्त आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझा कायम प्रयत्न राहील. अशी ग्वाही नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी जिल्हा बँकेतर्फे आयोजित सत्कार कार्यक्रमात दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचा सत्कार कार्यक्रम जिल्हा बँक सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, यांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर व सर्व संचालक, बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले मी या बँकेचा संचालक असताना मला मंत्री होण्याची संधी मिळाली. आता आणखी जबाबदारी वाढली आहे. आपले सर्वांचे प्रेम आणि विश्वास याला कुठेही तडा न जाता आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि बँकेचे हीत तसेच राज्य शासनाकडून आवश्यक असलेली मदत मिळवून देण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार आहे. त्यासाठी आपल्या मधील कायम संवाद राहणे महत्त्वाचे आहे.
यापूर्वी मी विरोधी पक्षात होतो, आता सत्तेत आहे. त्यामुळे “नाही” हा शब्द वापरता येणार नाही, तेव्हा आपल्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करणे ही माझी प्रथम जबाबदारी असणार आहे. सहकार आणि कृषी या क्षेत्राचे जलद गतीने काम झाले पाहिजे यासाठी मी कायम प्रयत्नशील राहील. अशी ग्वाही यावेळी नितेश राणे यांनी दिली. यावेळी जिल्हा बँकेच्या वतीने तसेच कर्मचाऱ्यांच्या वतीने आनंदी वातावरणात सत्कार करण्यात आला.